नवी दिल्ली, 04 नोव्हेंबर (हिं.स.) : नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्याने 132 जणांचा मृत्यू झाला आहे. जजरकोट आणि रुकुम हे पश्चिम नेपाळमधील भूकंपग्रस्त भाग आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. नेपाळमधील या आपत्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. या संकटाच्या प्रसंगी नेपाळसोबत असल्याचे मोदी यांनी ट्विटर संदेशात नमूद केलेय.
यासंदर्भातील आपल्या संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, नेपाळमध्ये भूकंपामुळे झालेल्या जीवितहानी आणि वित्तहानीमुळे आपण अत्यंत दु:खी आहोत. भारत नेपाळच्या लोकांसोबत एकजुटीने उभा आहे आणि शक्य ती सर्व मदत करण्यास तयार आहे. आमच्या संवेदना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत आणि आम्ही जखमींना लवकरात लवकर बरे व्हावं यासाठी प्रार्थना करतो असे मोदींनी म्हटले आहे. नॅशनल सेंटर फॉर सीस्मॉलॉजीनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.4 इतकी नोंदवण्यात आली आणि भूकंपाचे केंद्र नेपाळमध्ये 10 किमी आत होते. दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश आणि बिहारसह उत्तर भारतातील अनेक जिल्ह्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
हिंदुस्थान समाचार
