अयोध्येत आयोजित उत्सवात विचारपुष्पांची गुंफण
अयोध्या, 27 डिसेंबर (हिं.स.) : प्रभू श्रीराम आदर्श जीवनाचा परिपाक असून भारतीय समाजाच्या जीवनाचा आधार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल यांनी केले. हिंदुस्थान समाचार बहुभाषी वृत्तसंस्थेच्या सहभाग आणि पुढाकाराने धर्मनगरी अयोध्येत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
अयोध्येतील श्री मणिराम दास छावनी परिसरातील श्रीराम सत्संग भवनात आयोजित कार्यक्रमात डॉ. कृष्णगोपाल म्हणाले की, आगामी 22 जानेवारीला श्रीराम मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या ऐतिहासीक कार्यक्रमासाठी संपूर्ण जगातील हिंदू समाजात उत्साह आणि आनंद संचारला आहे. परकीय आक्रमकांनी मंदिरांचा विध्वंस करून हिंदू समाजावर प्रचंड अत्याचार केले होते. त्यामुळे धर्माच्या रक्षणासाठी मोठा संघर्ष करावा लागला. अशा कठीण काळात मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचे चरित्र समाजाला आदर्शाची प्रेरणा देत राहिले. मानवी जीवनातील आदर्श पुत्र, बंधू पती, मित्र, पिता आणि राजा म्हणून राम लोकांच्या हृदयात वास करू लागले. रामाकडून मिळालेला आदर्श आणि त्यांच्या जीवनातील संस्कार समाजासाठी प्रेरक आणि मार्गदर्शक ठरले. त्यामुळे परकीय आक्रमकांनी मंदिर नष्ट केले तरी जनतेच्या मनात रामाचे अढळस्थान कायम राहिले. त्यामुळेच 500 वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर रामाची पुन्हा एकदा अयोध्येत प्राणप्रतिष्ठा करणे शक्य होते आहे. रामाचे मंदिर हे मानवा पुढील आदर्श आणि देदिप्यमान इतिहासाची पुनर्स्थापना असल्याचे कृष्णगोपाल यांनी सांगितले.
याप्रसंगी अयोध्येतील महंत आचार्य मिथीलेश नंदिनी शरण म्हणाले की, भारतीय संकल्पनेत मानवतेचे जन्मस्थान अयोध्या आहे. यापूर्वी मानव केवळ मनुचा पुत्र होता. अयोध्येतील मर्यादेतील उत्तम आचरणाने मनुच्या पुत्रांना मानव बनवल्याचे आचार्य मिथीलेश यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार
