पुढील सुनावणी आगामी 30 ऑक्टोबरला होणार
नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर (हिं.स.) : शिवसेनेच्या आमदार अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टात आज, मंगळवारी पुन्हा सुनावणी झाली. या सुनावणीत विधानसभा अध्यक्षांना अपात्रतेच्या कारवाईबाबत वेळापत्रक मागितले होते. परंतु अध्यक्षांनी वेळापत्रक न दिल्याने कोर्टाने नाराजी व्यक्त केली. विधानसभा अध्यक्षांकडून वेळ मागण्यात आली. परंतु सुधारित वेळापत्रक न दिल्याने आज आम्ही आदेश देऊ असे सरन्यायमूर्ती म्हणाले. यावेळी विधानसभा अध्यक्षांच्या वकिलांनी मुदत मागिरतली. त्यामुळे शेवटची संधी म्हणून सुप्रीम कोर्टाने पुढील सुनावणी 30 ऑक्टोबर रोजी निश्चित केली आहे.
विधानसभा अध्यक्ष कोर्टाच्या निर्णयाचे पालन करत नाही. अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर कोर्टाने नाराजी व्यक्त केली. यावेळी सरन्यायमूर्तींनी दहाव्या सूचीने वाचन करून दाखवले. गेल्या 11 मे नंतर अध्यक्षांनी काही कार्यवाही केली नाही असे सरन्यायमूर्तीं म्हणाले. विधानसभा अध्यक्ष हे घटनात्मक पद असले तरी सुप्रीम कोर्ट त्यांना आदेश देऊ शकते असे सरन्यायमूर्तींनी सांगितले. शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत याचिका 23 जून 2022 रोजी दाखल झाली होती दसऱ्यादरम्यान विधानसभा अध्यक्षांसोबत बसून वेळापत्रक देऊ असे विधानसभा अध्यक्षांच्या वकिलांनी कोर्टात सांगितले. त्यामुळे पुढील सुनावणी 30 ऑक्टोबरला होणार आहे. पुढच्या सुनावणीवेळी विधानसभा अध्यक्षांनी वेळापत्रक सादर करा असा निर्देश कोर्टाने दिले आहेत.
हिंदुस्थान समाचार
