दौसा, 06 नोव्हेंबर (हिं.स.) : राजस्थानच्या दौसा येथे झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झालाय. हरिद्वारहून उदयपूरला जाणारी बस दौसा येथील पुलाचे कठडे तोडून थेट रेल्वे रुळावर कोसळली. या अपघातात 28 जण जखमी झाले आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर 2.15 वाजेच्या सुमाराला हा अपघात घडला.
यासंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त बस ही हरिद्वारहून उदयपूरला जात होती. रात्री 2.15 वाजेच्या सुमाराला जिल्हाधिकारी कार्यालय सर्कल येथील कल्व्हर्टवर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यामुळे ही बस कठडे तोडून बस सुमारे 50 फुटवरून खाली असलेल्या रेल्वे रुळावर पडली. यात चार प्रवासी हे जागीच ठार झाले तर 28 जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी बचाव कार्य सुरू केले. बसमध्ये जखमी असलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही बाजूने रेल्वे वाहतूकही बंद करण्यात आली. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गंभीर असलेल्या रुग्णांना जयपूरला पाठवण्यात आले. डिसीएम राजकुमार कासवा यांनी सांगितले की, अपघातानंतर आणखी एक उपविभागीय अधिकारी घटनास्थळी पाठवण्यात आला आहे. अपघातस्थळाची पाहणी करण्यात आली आहे. जखमींवर उपचार करण्याच्या सूचना डॉक्टरांना देण्यात आल्या. अपघातानंतर जिल्हाधिकारी कमर उल जमान यांनीही मदतकार्याचा आढावा घेतला.
हिंदुस्थान समाचार
