जयपूर, 27 ऑगस्ट (हिं.स.) : जोधपूरमध्ये लैंगिक अत्याचार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसारामला राजस्थान उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने त्याची अंतरिम जामिनावधी वाढवण्यास नकार दिला आहे. अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या वैद्यकीय अहवालाच्या आधारे हा निर्णय देण्यात आला. आता आसारामला ३० ऑगस्टपर्यंत जोधपूर सेंट्रल जेलमध्ये आत्मसमर्पण करावे लागेल.
राजस्थान उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की वैद्यकीय अहवालानुसार सध्या आसारामची प्रकृती जेलमध्ये राहण्यासाठी योग्य आहे. हा आदेश हायकोर्टाचे न्यायमूर्ती दिनेश मेहता आणि न्यायमूर्ती विनीत कुमार माथुर यांच्या खंडपीठाने दिला आहे. न्यायालयाने असेही म्हटले आहे की, भविष्यात जर त्यांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड झाला, तर ते पुन्हा जामिनासाठी अर्ज करू शकतात. मात्र सध्या ते स्वस्थ आहेत आणि त्यांना तुरुंगात परत जाऊन शिक्षा भोगणे आवश्यक आहे.न्यायालयाच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, आसारामला ३० ऑगस्टपर्यंत जोधपूर सेंट्रल जेलमध्ये आत्मसमर्पण करावे लागेल. सध्या त्याच्यावतीने जामिनावधी वाढवण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, सरकारी रुग्णालयातील तीन डॉक्टरांनी त्यांच्या वैद्यकीय अहवालात जो अभिप्राय दिला त्याच्या आधारे कोर्टाने हा जामिनाचा अर्ज फेटाळला. हा निर्णय लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात आधीच जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या आरोपीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.याआधी, १२ ऑगस्ट रोजीही आसारामने जामिनासाठी अर्ज केला होता, त्यावेळी न्यायालयाने वैद्यकीय अहवालाच्या आधारे २९ ऑगस्टपर्यंत जामिनाची मुदत वाढवली होती, मात्र यावेळी कोर्टाने थेट आत्मसमर्पणाचा आदेश दिला आहे.न्यायालयाने हेही स्पष्ट केले की, भविष्यात जर आसारामला कोणतीही गंभीर आरोग्य समस्या उद्भवली, तर नवीन वैद्यकीय अहवालाच्या आधारावर ते पुन्हा जामिनासाठी अर्ज करू शकतात.सध्याचा आदेश स्पष्ट संकेत देतो की ते आता तुरुंगाबाहेर राहू शकणार नाहीत आणि ठरलेल्या वेळेत आत्मसमर्पण करणे अनिवार्य आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode
