पोलिसाच्या बालिकेवरील अत्याचाराचे प्रकरण
दौसा, 11 नोव्हेंबर (हिं.स.) : राजस्थानच्या दौसा येथे एका 4 वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आलीय. विशेष म्हणजे पिडीत बालिका ही पोलिस हवालदाराची मुलगी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पोलिस उपनिरीक्षकास दौसाच्या पोलीस लाईन परिसरात तैनात करण्यात आले होते. पण, राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुवास पोलीस ठाण्यात कर्तव्यासाठी येण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार राहुवास येथील एका सहकारी हवालदाराच्या घरी हा उपनिरीक्षक भाड्याने राहत होता. तेव्हा, शेजारी राहत असलेल्या दुसऱ्या हवालदाराची 4 वर्षीय मुलगी अंगणात खेळत होती. यावेळी उपनिरीक्षकाने चिमुरडीला आमिष दाखवून खोलीत नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. चिमुरडीने अत्याचाराची माहिती आईस सांगितली. नंतर जयपूर पोलीस ठाण्यात हवालदार असलेले चिमुरडीचे वडील रात्री कामावरून घरी आले. तेव्हा सगळी माहिती त्यांना देण्यात आली. त्यांनी तातडीने राहुवास पोलीस ठाणे गाठून उपनिरीक्षकाविरोधात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. यानंतर स्थानिक नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यावर पोलिसांनी उपनिरीक्षकावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
हिंदुस्थान समाचार
