धुक्यामुळे विमान बांगलादेशात वळवावे लागले
नवी दिल्ली, 13 जानेवारी (हिं.स.) : मुंबई-गुवाहाटी इंडिगो विमानाचे आज, शनिवारी बांगलादेशातील ढाका येथे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. आसामच्या गुवाहाटी विमानतळावर दाट धुके पसरल्यामुळे हे विमान लँड होऊ शकले नाही. त्यामुळे गुवाहाटीपासून 400 किलोमीटर अंतरावरील ढाका विमानतळावर आपातकालिन स्थितीत विमान लँड करावे लागले. मुंबई युवक काँग्रेसचे सूरज सिंह ठाकूर यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली.
सूरज सिंह ठाकूर यांनी ट्विटरवरील एका पोस्टमध्ये सांगितले की, ते मुंबई ते गुवाहाटी या फ्लाइटमध्ये होते, मात्र, धुक्यामुळे हे विमान वळवण्यात आले आणि ढाका येथे उतरवण्यात आले. त्यांनी ट्विट करत लिहिले आहे की, मी इंडिगो फ्लाइट क्रमांक 6-ई 5319 मधून मुंबईहून गुवाहाटीला जाण्यासाठी बसलो. हे विमान गुवाहाटी येथे आले असता, या ठिकाणी असलेल्या दाट धुक्यामुळे ते गुवाहाटीमध्ये उतरू शकले नाही. यामुळे वैमानिकाने हे विमान ढाका येथे उतरवले. परदेशात झालेल्या लँडिंगमुळे विमानातील सर्व प्रवाशांनी त्यांच्या पासपोर्टशिवाय आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली. दरम्यान इंडिगोकडून प्रवाशांना ढाका येथे लँडिंगची कल्पना देऊन त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली. या घटनेसंदर्भात इंडिगोच्या अधिकाऱ्याने सांगितले की, या इमर्जन्सी लँडिंगमुळे मोठा अपघात टळला आणि सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
हिंदुस्थान समाचार
