नवी दिल्ली, 17 जानेवारी (हिं.स.) : ‘कॅश फॉर क्वेरी’ प्रकरणी खासदारकी गमावणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांना सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीस बजावण्यात आलीय. संसदेच्या हिवाळी अधिवेशन काळात 8 डिसेंबर 2023 रोजी मोईत्रांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. त्यानंतर संपदा संचालनालयाने 16 जानेवारी रोजी मोईत्रांना ही नोटीस बजावली आहे.
केंद्रीय गृहनिर्माण आणि व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, महुआ यांना तात्काळ बंगला रिकामा करण्यास सांगण्यात आले आहे. लवकरच इस्टेट संचालनालयाचे अधिकारी त्यांच्या बंगल्यावर भेट देतील आणि बंगला लवकरात लवकर रिकामा होईल याची खात्री करतील. यापूर्वी 7 जानेवारी रोजी मोईत्रा यांना बंगला रिकामा करण्यास सांगण्यात आले होते. यानंतर 12 जानेवारीला त्यांना दुसरी नोटीस पाठवण्यात आली होती. आता त्यांना तिसऱ्यांना नोटीस बजावण्यात आलीय. दरम्यान महुआ मोईत्रा यांनी खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हन दिलेय. त्याचा निकाल येईपर्यंत त्या सरकारी बंगला रिकामा करण्याच्या मानसिकतेत नसल्याचे तृणमूल काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार
