बेंगळुरू, 16 ऑगस्ट (हिं.स.)। कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमधील के.आर. मार्केटजवळ नागरथपेट येथे चार मजली व्यापारी इमारतीला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील चार सदस्यांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. इमारतीत अजूनही अनेक लोक अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या अपघातातील मृतांची ओळख राजस्थानचे रहिवासी मदन (38), त्यांची पत्नी संगीता (33), मुलगा मितेश (8) आणि विहान (5) अशी झाली आहे. हे सर्व एकाच कुटुंबातील होते. याशिवाय दुसऱ्या मजल्यावर काम करणारे सुरेश यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, इमारतीच्या तळमजल्यावरील प्लास्टिक मॅटच्या गोदामात आग लागली आणि ती झपाट्याने पसरली. काही क्षणांतच ही आग तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचली. तिथे राहत असलेले राजस्थानचे रहिवासी मदन कुमार, त्यांची पत्नी संगीता आणि मुलं विहान व नितेश हे आग लागलेल्या इमारतीत अडकले. आगीत होरपळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी पहिल्या मजल्यावर काम करणारे मजूर सुरेश यांचाही मृत्यू झाला.
बेंगळुरू शहराचे पोलीस आयुक्त सीमांत कुमार सिंह यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी अजूनही इमारतीत काही लोक अडकले असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले असून, बचावकार्य सुरू आहे. तसेच घटनास्थळी तातडीने रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत.
—————
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule
