सहलीला निघालेल्या बसला ताम्हिणी घाटात अपघात
पुणे, 30 डिसेंबर (हिं.स.) : पुण्यातून शाळेची सहल घेऊन जाणाऱ्या एका बसचा ताम्हिणी घाटात भीषण अपघात झाला आहे. ही बस कोंडेघर गाव हद्दीत उलटली असून यात 2 जणांचा मृत्यू झाला असून 55 जण जखमी झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने बचाव कार्य राबवून बसमध्ये अडकले असणाऱ्या नागरिकांना बाहेर काढले. जखमींवर नजीकच्या माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत.
मिळालेल्या माहीतीनुसार पुण्याहून शाळेची सहल कोकणात जात होती. यावेळी एका वळणावर कोंडेघर गाव हद्दीत ही बस (क्र. एमएच. 04 एफके 6299) अनियंत्रित होऊन उलटली. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी महाड, माणगाव इथून बचाव पथके आणि रुग्णवाहीका घटना स्थळाकडे रवाना करण्यात आले आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून काही जणांची प्रकृती ही गंभीर असल्याचे समजते. हा अपघात आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास घडला.ताम्हिणी घाटात अवघड वळणावर बस चालकाचा नियंत्रण सुटल्याने बस उलटली अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. अपघातात बसमधील अनेक प्रवासी अडकले होते. यावेळी कोंडेघर गाव परिसरातील नागरीक घटनास्थळी येत त्यांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले.अपघातामुळे काही काळ या मार्गवर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी येथील वाहतूक ही सुरळीत केली आहे.
हिंदुस्थान समाचार
