* ९ डिसेंबरपासून मरेवरील फलाट होणार ८ ते १४ क्रमांकाचे
मुंबई, २४ नोव्हेंबर (हिं.स.) : मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील फलाट क्रमांक एकच्या रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून यापुढे फलाट क्रमांक दोन इतिहासजमा होणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पश्चिम रेल्वेवरील फलाट क्रमांक ‘जैसे थे’ राहणार असून ९ डिसेंबरपासून मध्य रेल्वेवरील पहिल्या क्रमांकाच्या फलाटाला आठ क्रमांक देण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात हे फलाट ८ ते १४ क्रमांकाने संबोधले जातील.
दादर हे मुंबईतील मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांना जोडणारे महत्वाचे स्थानक आहे. या स्थानकावर नेहमीच गर्दी असते. दोन्ही रेल्वे स्थानकांतील फलाट क्रमांक स्वतंत्र असले, तरी नव्याने येणाऱ्या प्रवाशांना दोन्हीकडे असलेल्या एकाच फलाट क्रमांकामुळे गोंधळ निर्माण होतो. प्रवाशांचा गोंधळ कमी व्हावा आणि दोन्ही यंत्रणेच्या फलाट क्रमांकात सुसूत्रता यावी, यासाठी १ ते १४ असे सलग फलाट क्रमांक देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये पश्चिम रेल्वेवरील १ ते ७ फलाट क्रमांक कायम राहतील. मात्र मध्य रेल्वेवरील सध्याचा १ क्रमांकाचा फलाट क्रमांक ८ होईल. फलाट क्रमांक दोन इतिहासजमा होणार आहे. तसेच सध्याचे ३ ते ८ क्रमांकाच्या फलाटांचे क्रमांक बदलून ते अनुक्रमे ९ ते १४ असे संबोधले जातील. हे सर्व बदल केंद्रीय रेल्वे सूचना प्रणालीमधील उद्घोषणा यंत्रणेतही होतील, तसेच पादचारी पूल व दिशादर्शक फलकांवरही ते सुधारून नव्याने दिले जातील.
दादरचा इतिहास
‘दादर’ या शब्दाचा अर्थ जिना किंवा शिडी असा आहे. पूर्वी परळ आणि माहीम यांच्यामध्ये चालायचे रस्ते फार थोडे होते. इतरत्र माळरान, खाड्या आणि डबकी होती. या भागातील लोकांनी ही जागा दगड-मातीने भरली. अशाप्रमाणे दादरने सखल परळला थोड्या उंचावरच्या माहिमला जोडले. म्हणून दादर या नावाने प्रसिद्ध झाले. दादर स्थानक १२ एप्रिल १८६४ रोजी सुरू करण्यात आले. परंतु १० मे १९७४ रोजी ते उपनगरीय गाड्यांचे टर्मिनल स्थानक बनले.
मुंबईकरांसाठी ‘लाईफ लाईन’
मुंबई उपनगरीय रेल्वे ही मुंबई शहर आणि उपनगरात असलेली एक सार्वजनिक वाहतूक प्रणाली आहे. जगातल्या सर्वांत अधिक प्रवासी घनता असणाऱ्या शहरी रेल्वे प्रणालींपैकी ही एक आहे. तिला ‘लाईफ लाईन’ (जीवन वाहिनी) म्हणूनही ओळखले जाते. उपनगरी रेल्वेने मुंबईत ७५ लाखांहून अधिक प्रवासी दररोज प्रवास करतात. ही संख्या संपूर्ण भारतीय रेल्वेच्या एकूण प्रवासी संख्येच्या अर्ध्याहून जास्त आहे. सर्वसामान्य लोक या मार्गांवर चालणाऱ्या गाड्यांना ‘लोकल ट्रेन’ असे म्हणतात. मुंबईहून पुणे, नाशिक, बडोदाकडे जाणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या सर्व गाड्यांचा दादर हा एक महत्त्वाचा थांबा आहे.
हिंदुस्थान समाचार
