रांची, 01 जानेवारी (हिं.स.) : नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी झारखंडमध्ये झालेल्या भीषण रस्ता अपघातात 6 मित्रांचा मृत्यू झाला. झारखंडच्या बिष्टुपूर पोलिस स्टेशन हद्दीतील सर्किट हाउस भागात हा अपघात घडला.
यासंदर्भात प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार वेगात असलेल्या कारवरील नियंत्रण सुटल्याने ती पहिल्यांदा डिव्हायडला धडकली आणि नंतर एका झाडावर आदळून उलटली. या कार दुर्घटनेत कारमधील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. धडक इतकी जबरदस्त होती की, याचा आवाज खूप दूरपर्यंत ऐकू आल्याने लोक घरातून बाहेर धावत आले.स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले, तसेच जखमींना बाहेर काढण्यात आले. पोलिसांकडून हे तरूण कुठे पार्टी करण्यासाठी गेले होते याचा शोध घेतला जात आहे. हे सर्व मृत तरुण हे आरआयटी पोलिस स्टेशन हद्दीतील कुलुप्तांग येथील आहेत. या अपघातात जखमी झालेल्या रविशंकर याच्या वडिल सुनील झा यांनी सांगितले की या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. सुदैवाने त्यांचा मुलगा बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त वाहानामध्ये 8 जण प्रवास करत होते. ज्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाला आहे तर 2 जण बचावले आहेत.
हिंदुस्थान समाचार
