करचुकवेगिरी प्रकरणी प्राप्तीकर विभागाची कारवाई
रांची, भुवनेश्वर, 09 डिसेंबर (हिं.स.) : मद्य उत्पादक कंपनीविरुद्धच्या करचुकवेगिरी प्रकरणी झारखंड आणि ओडिशातील अनेक ठिकाणी सुरू असलेली प्राप्तीकर विभागाची छापेमारी शनिवारी चौथ्या दिवशीही सुरूच आहे. प्राप्ती विभागाने आतापर्यंत सुमारे 300 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे.
प्राप्ती विभागाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिकार्यांचे पथक शनिवारी सकाळी 3 बॅगांसह रांची येथील काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या निवासस्थानातून निघाले. धीरज साहू यांच्या घरातून जप्त केलेल्या पिशव्या या दागिन्यांनी भरल्या होत्या, अशी माहिती पुढे आली आहे. प्राप्तीकर विभागाने संबलपूर, बोलंगीर, टिटिलागड, बौध, सुंदरगड, राउरकेला आणि भुवनेश्वर येथे देखील छापे टाकले आहेत. या छाप्याबाबत मद्य विक्री करणाऱ्या कंपनीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ही कंपनी झारखंडमधील काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांची असल्याची माहिती पुढे आलीय. प्राप्तीकर विभागाने शुक्रवारी तिसर्या दिवशी ओडिशा-आधारित मद्य उत्पादक कंपनीवर कर आकारणीवर छापे टाकले आणि रोखीने भरलेल्या 156 बॅग जप्त केल्या. या छाप्यात आतापर्यंत सुमारे 300 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.
धीरज साहू काँग्रेसचे नेते असून झारखंडमधून राज्यसभेचे खासदार आहेत. धीरज साहू यांचे बंधू शिवप्रसाद साहू हेही खासदार होते. धीरज यांचे कुटुंब काँग्रेस पक्षाशी संबंधित आहे. धीरज यांनी 1977 मध्ये राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर जून 2009 मध्ये ते पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून आले होते. धीरज 2020 प्रसिद्धीच्या झोतात आले होते, जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या निवडणुकीशी संबंधित याचिका फेटाळली होती. भाजपचे उमेदवार प्रदीप सोथनालिया यांनी त्यांच्या निवडणुकीला आव्हान दिले होते. 2018 मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रदीप सोनथालिया यांनी धीरज साहू यांना राज्यसभेत आव्हान दिले होते.
हिंदुस्थान समाचार
