तब्बल 3 तासांनी शक्य झाली सुखरूप लँडिंग
पणजी, 14 नोव्हेंबर (हिं.स.) : विमानतळाच्या धावपट्टीवर अचानक कुत्रा आल्यामुळे बंगळुरूहून आलेल्या विस्तारा एअरलाईन्सच्या विमानाला परत फिरावे लागले. ही घटना सोमवारी 13 नोव्हेंबर रोजी गोव्याच्या दाबोलीम विमानतळावर घडली.
याबाबत गोवा विमानतळ संचालक धनंजय राव यांनी दिलेल्या माहितीनुसार विस्तारा एअर लाईन्सच्या विमानाने (फ्लाइट क्र. युके 881) बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाहून सोमवारी दुपारी 12.55 वाजता उड्डाण केले. दीड तासानंतर विमान गोव्यातील दाबोलीम विमानतळावर उतरणार होते. परंतु, अचानक एक कुत्रा धावपट्टीवर आला. एअर ट्रॅफिक कंट्रोलरने तात्काळ पायलटला माहिती दिली आणि काही वेळ थांबण्यास सांगितले. पण पायलटने विमान बेंगळुरूला परत नेले. त्यानंतर हे विमान 3 तासांनी परतले. विमानतळाच्या धावपट्टीवर कुत्रा दिसताच दाबोलीम एअर ट्राफिक कंट्रोलरने वैमानिकाला काही वेळ हवेत राहण्यास सांगितले परंतु त्याने बंगळुरूला परतणे पसंत केले.
या घटनेनंतर विस्तारा एअर लाईन्सने फ्लाइटचे प्रस्थान आणि आगमन याची माहितीही सोशल मीडियावर दिली. विस्ताराने लिहिले की, गोवा विमानतळाच्या धावपट्टीवर अडथळा निर्माण झाल्यामुळे बेंगळुरूहून गोव्याला जाणारे विमान बेंगळुरूच्या दिशेने वळवण्यात आले. त्यानंतर
2 तासांनंतर दुसर्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, फ्लाइट क्र. युके-881, जे बेंगळुरूकडे वळवण्यात आले होते, त्याने बेंगळुरूहून 4:55 वाजता उड्डाण केले आणि 6:15 वाजता गोव्यात पोहोचले. असे विस्ताराच्या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलेय.
हिंदुस्थान समाचार
