जीवनमानातील बदलांमुळे वाढले तरुणांचे मृत्यू
नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर (हिं.स.) : गेल्या काही दिवसात तरुणांमध्ये हार्ट अटॅकने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले होते. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दुष्प्रभावामुळे हे मृत्यू होत असल्याची शंका व्यक्त करण्यात आली होती. परंतु, तरुणांचे मृत्यू कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामुळे झाले नसल्याचा अहवाल आयसीएमआरने दिलाय. तसेच हे मृत्यू जीवनमानातील बदलांमुळे झाल्याचा दावा आयसीएमआरने केलाय.
कोरोना साथरोगाला थोपवण्यासाठी भारताने जगातील सर्वात मोठे लसीकरण अभियान राबवले होते. देशातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसींचे 2 अब्जांहून अधिक डोस देण्यात आले आहेत. मात्र, यानंतर देशातील तरुणांमध्ये हार्ट अटॅकने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले होते. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामुळे हे मृत्यू होत असल्याची शंका व्यक्त करण्यात येत होती. मात्र, आता आयसीएमआरने या सर्व शंका नाकारल्या आहेत. अचानक होणाऱ्या मृत्यूला लस कारणीभूत नाही. तर आधी कोरोना झालेला असणे, मृत्यूपूर्वी 48 तासांमध्ये दारुचे सेवन करणे, अंमली पदार्थांचे सेवन किंवा अती-व्यायाम अशा काही कारणांमुळे हे अचानक मृत्यू झाले असण्याची शक्यता या संशोधनात वर्तवण्यात आली आहे. आयसीएमआरने 1 ऑक्टोबर 2021 ते 31 मार्च 2023 या कालावधीत देशभरातील 47 रुग्णालयांचा अभ्यास करुन हे संशोधन प्रसिद्ध केलेय. यामध्ये 18 ते 45 वर्षे वयोगटातील निरोगी व्यक्तींचा देखील समावेश करण्यात आला होता. ज्यांनी कोविड प्रतिबंधात्मक लसीचे 2 डोस घेतले होते, अशा लोकांना अचानक होणाऱ्या मृत्यूचा धोका अगदी कमी असल्याचे यात आढळून आले.
हिंदुस्थान समाचार
