कासगंज येथे ट्रॅक्टर तलावात कोसळून झाली दुर्घटना
कासगंज, फेब्रुवारी : उत्तरप्रदेशच्या कासगंज येथे ट्रॅक्टर तलावात कोसळून झालेल्या अपघातातील मृतकांची संख्या 24 झाली आहे. कासगंज इथल्या पटियाली-दरियावगंज मार्गावर ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन तलावात कोसळल्याने हा अपघात घडला. मृतकांमध्ये 7 लहान मुले आणि 8 महिलांचा समावेश आहे.
या अपघाताबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास कासगंजमधील पटियाली दरियावगंज रस्त्यावर एक अनियंत्रित ट्रॅक्टर ट्रॉली तलावात कोसळली. घटनेच्या वेळी ट्रॉलीमध्ये 52 जण प्रवास करीत होते. त्यापैकी 24 जण मृत्यूमुखी पडले आहे. हे सर्वजण एका 6 महिन्यांच्या बाळाची जावळे काढण्यासाठी (मुंडन करण्यास) चालले होते. अपघातग्रस्त ट्रॅक्टरमधील बहुतांश लोक एटा जिल्ह्याच्या नगला कसा येथील रहिवासी होते. अपघातातील जखमींपैकी 5 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना अलिगडच्या रुग्णालयात हलविण्यात आलेय. आतापर्यंत पोलिसांनी तलावात पडलेल्या सर्वांना बाहेर काढले आहे. केवळ ज्या बाळाची जावळे काढण्यासाठी हे सर्वजण चालले होते त्या बाळाचा शोध लागू शकला नाही.
