नवी दिल्ली, दिल्ली दारू धोरण प्रकरणी तिहार तुरुंगात बंद असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सोमवारी न्यायालयातून मोठा धक्का बसला. केजरीवाल यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात याचिका दाखल केली होती, जी फेटाळण्यात आली आहे.
याचिकेत केजरीवाल यांनी तिहार तुरुंग अधिकाऱ्यांना त्यांना इन्सुलिन देण्याच्या सूचना आणि त्यांच्या साखरेची पातळी आणि मधुमेहाबाबत दररोज 15 मिनिटे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला घेण्याची परवानगी मागितली होती. त्यांची याचिका कोर्टात फेटाळण्यात आली. मात्र, न्यायालयाने केजरीवाल यांच्यासाठी वैद्यकीय मंडळ तयार करण्याचे आदेश दिले आहेत. केजरीवाल 1 एप्रिलपासून तिहारमध्ये असून त्यांच्या न्यायालयीन कोठडीवर मंगळवारी 23 एप्रिल रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे.
अरविंद केजरीवाल यांना टाइप-2 मधुमेह आहे. त्यांना 21 मार्च रोजी दारू घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. तर 18 एप्रिल रोजी केजरीवाल यांचे वकील विवेक जैन यांनी ट्रायल कोर्टात केजरीवाल यांच्या डॉक्टरांकडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वैद्यकीय सल्ला घेण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. त्यांनी असा युक्तिवाद केला होता की केजरीवाल हे टाइप-2 मधुमेहाचे रुग्ण आहेत आणि त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी सतत कमी-जास्त होत असते.
प्रत्युत्तरादाखल ईडीने राऊस एव्हेन्यू कोर्टाला सांगितले की, केजरीवाल तिहार तुरुंगात जाणूनबुजून मिठाई खात होते. केजरीवाल यांच्या घरातूनही असेच अन्न येत आहे, ज्यात साखर आणि कर्बोदकांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे त्यांची साखरेची पातळी वाढते. वैद्यकीय आधारावर जामीन मिळावा केजरीवाल हे सर्व करीत असल्याचे ईडीने म्हंटले होते. राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने त्यादिवशी निकाल राखून ठेवला होता. तो निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला.एम्सचे संचालक केजरीवाल यांच्यासाठी वैद्यकीय मंडळ तयार करतील, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. केजरीवाल यांना इन्सुलिन द्यायचे की नाही हे वैद्यकीय मंडळच ठरवेल. त्याचा आहारही वैद्यकीय मंडळ ठरवेल. केजरीवाल तुरुंगात कोणता व्यायाम करावा हेही वैद्यकीय मंडळ ठरवेल.
