* भाजपनं कमळाऐवजी वॉशिंग मशीनचं चिन्हा करावा!
नवी दिल्ली, ५ ऑक्टोबर : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वापर करण्याचा अधिकार फक्त आम्हालाच आहे. आज ७० लोकांनी माझ्या नावाचा प्रस्ताव दिला आहे. पक्ष आणि चिन्ह हे आपलंच असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विस्तारित कार्य समितीची आज दिल्लीतल्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
पवार म्हणाले की, पक्षाचं चिन्ह त्यांना मिळेल असा त्यांचा दावा आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय काही आला तरी चिंता करण्याचं कारण नाही. पक्ष आणि चिन्ह वापरण्याचा अधिकार फक्त आम्हाला आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय आपल्या बाजूने लागेल. देशाचं राजकारण बदलत आहे. आज अनेक राज्यात भाजपाचं सरकार नाही. काही राज्यातील विरोधी पक्षाची सरकारं पाडून अनेक ठिकाणी भाजपने सत्ता स्थापन केली आहे.
ते पुढे म्हणाले, आपल्याच जुन्या सहकाऱ्यांनी आपल्याविरोधारात निवडणूक आयोगात तक्रार केली आहे. त्याचं उत्तर आज दिल्लीतील कार्यकारणीच्या बैठकीत झालेल्या ठरावाने दिलं आहे. ते लोक म्हणतात की तेच राष्ट्रवादी काँग्रेस आहेत. तालकटोरा येथे झालेल्या बैठकीतील राष्ट्रीय अध्यक्षाची निवडच चुकीची आहे. ते म्हणतात की निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना काहीच अधिकार नाहीत. यापुढे जाऊन ते म्हणतात की तेच राष्ट्रवादी काँग्रेसचे खरे अध्यक्ष आहेत पदाधिकारी आहेत आणि पक्षाचं नाव, पक्षचिन्ह याचा वापर करण्याचा अधिकार केवळ त्यांनाच आहे. आपल्याला नाही.
आठ लोकांना मंत्रिमंडळात सहभागी केलं. हे लोक मला भेटायला आले होते. तेव्हा त्यांनी म्हटलं की, आमच्या मागे ईडी लावली आहे. त्यामुळे आम्हाला बीजेपी सोबत जावं लागलं. तुम्ही याबाबत काहीतरी उपाययोजना करा असं अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचं म्हणणं होते. काही इमानदार कार्यकर्ते होते. त्यापैकी एक अनिल देशमुख. त्यांनी पक्ष सोडला नाही असंही पवार म्हणाले.
पवार म्हणाले की, बंडखोरी करून बाहेर पडलेल्याची निवड ही चुकीची आहे. निवडणुकीची पद्धत कशी असावी हे मी त्यांना सांगितलं. जे आज म्हणतात की ही निवडणूक योग्य नव्हती. मात्र यावर त्यांच्या सह्या आहेत. आम्ही एकत्र बसलो चर्चा केली. जे लोक गेलेत ते म्हणतात की पक्ष आम्हाला मिळेल चिन्ह मिळेल. जे अजून व्हायचे आहे ते कसं सांगतात की हा निर्णय आमच्या बाजूने लागेल? मला कळत नाही हे असं कसं असू शकतं? असे प्रश्नही पवारांनी उपस्थित केले.
भाजपने निवडणूक चिन्ह बदललं पाहिजे. लोक म्हणतात त्यांनी चिन्ह बदलून वाशिंग मशीन करावं असं लोक महाराष्ट्रात म्हणतात. ईडी, सीबीआय आयटी यांचा गैरवापर केला जातोय. एका मीडिया हाऊसवर छापेमारी केली. त्यांच्या विरोधात तक्रार केली की चीनला मदत केली. कालची कारवाई ठीक नाही. ती कारवाई चुकीची आहे. त्यांनी भाजपची स्थिती मांडली होती. देशात बदल होईल असेही शरद पवार यावेळी बोलताना म्हणाले.
