नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी : सरकारशी वार्ता फिस्कटल्यानंतर दिल्लीच्या दिशेने कुच करणाऱ्या शेतकरी आंदोलनाला आज, बुधवारी हिंसक वळण लागले. पोलिसांनी रोखल्यानंतर आंदोलकांची झटापट झाली. यात एका आंदोलकाचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
यासंदर्भातील माहितीनुसार शेतकरी नेते आणि सरकार यांच्यात चौथ्या फेरीतील वार्ता निष्फळ ठरल्यानंतर आंदोलकांनी ट्रॅक्टर आणि इतर अवजड वाहनांसह दिल्लीच्या दिशेने कुच करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पोलिस आणि प्रशासनाने शेतकऱ्यांना थोपवण्यासाठी तयारी केली. तर केंद्रीय कृषीमंत्री अर्जुन मुंडा यांनी शेतकरी नेत्यांना पाचव्या फेरीतील चर्चेचा प्रस्ताव ठेवला. तसेच शेतकऱ्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. परंतु, आंदोलक पंजाब आणि हरियाणा सीमेला जोडणाऱ्या खनौरी सीमेवरील बॅरिकेड्सकडे निघाले. हे आंदोलक बॅरिकेड्स तोडून दिल्लीच्या दिशेने कुच करण्याच्या प्रयत्नात होते. शेतकऱ्यांचे हे हिंसक आंदोलन पाहून घटनास्थळी तैनात असलेल्या हरियाणा पोलिसांनी मोर्चा सांभाळला. यावेळी आंदोलकांना रोखण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. तसेच आंदोलकांना पांगवण्यासाठी रबरी बुलेट्सचाही वापर करावा लागला. या घटनेत 20 वर्षीय आंदोलकाचा मृत्यू झाला आहे. तर 25 जण जखमी झाले आहेत. यांपैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमी आंदोलकांपैकी 10 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. तर इतरांवर शंभू येथील तात्पुरत्या स्वरुपाच्या वैद्यकीय शिबिरात प्राथमिक उपचार करण्यात आले. जखमींपैकी 3 शेतकऱ्यांना पटियाला येथील राजिंद्र रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संगरूरचे सिव्हिल सर्जन डॉ कृपाल सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 26 वर्षीय व्यक्तीच्या डोक्याला दुखापत झाली असून त्याला राजींद्र रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान आंदोलकाच्या मृत्यूची बातमी समजताच पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडणे बंद केले.
