आयकर विभागाकडून 564 कोटी रुपयांच्या दंडाची नोटीस
नवी दिल्ली, : आयकर विभागाने बँक ऑफ इंडियाला (बीओआय) 564.44 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. याप्रकरणी बीओआय आयकर आयुक्त, नॅशनल फेसलेस अपिल सेंटरमध्ये (एनएफएसी) अपिल दाखल करणार असून याप्रकरणी पुढील आठवड्यात सुनावणीची शक्यता आहे.
बँक व्यवस्थापनातील वरिष्ठ सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार इन्कम टॅक्स विभागाकडून बँकेला 564.44 कोटी रुपयांच्या दंडाची नोटीस मिळाली आहे. आम्ही याप्रकरणी आयकर आयुक्त, नॅशनल फेसलेस अपिल सेंटरमध्ये (एनएफएसी) अपिल दाखल करणार आहे. यासोबतच बँकेने स्टॉक एक्स्चेंजला कळवले आहे की, बीओआयला आयकर विभागाकडून, 2018-19 च्या मूल्यांकन वर्षाशी संबंधित आयकर कायदा, 1961 च्या कलम 270-ए अंतर्गत मूल्यांकन युनिटकडून 564.44 रुपये दंड आकारण्याचा आदेश प्राप्त झाला आहे. विविध नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल हा दंड आकारण्यात आला आहे. बँकेने सांगितले की, या दंडाची रक्कम निश्चितपणे कमी होईल अशी आम्हाला खात्री आहे. त्यामुळे या नोटीसीमुळे बँकेच्या आर्थिक, परिचालन किंवा इतर कामांवर कोणताही परिणाम होणार नाही असा विश्वासही बँकेच्या व्यवस्थापनातर्फे व्यक्त करण्यात आलाय.
