नलबारी, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत देशात येत्या 5 वर्षात आणखी 3 कोटी नवी घरे बांधणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. आसामच्या नलबारी येथे आज, बुधवारी एका जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते.
याप्रसंगी मोदी म्हणाले की, आजचा दिवस रामनवमीचा आहे आणि हे ऐतिहासिक पर्व आहे. 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर प्रभू राम त्यांच्या भव्य मंदिरात विराजमान झाले आहेत. तसेच एनडीएने देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्याचा आणि त्यांना त्यांच्या हक्काच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील 5 वर्षात आणखी 3 कोटी नवीन घरे बांधली जातील. तसेच कोणताही भेदभाव न करता मोफत रेशनही दिले जाईल. भाजपने आपल्या संकल्प पत्रात आणखी एक घोषणा केली आहे ज्याचा फायदा देशातील प्रत्येक घराला होईल. आयुष्मान योजनेंतर्गत 70 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देण्याचा निर्णय एनडीए सरकारने घेतल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. देशातील सर्वात मोठा नदी पूल असलेला भूपेन हजारिका सेतू आणि देशातील सर्वात लांब रेल्वे पूल, बोगीबील पूल, आसाममध्ये आहेत. आसामचे स्वतःचे एम्स गुवाहाटीतच उघडले आहे. बारपेटा आणि कोक्राझारमध्येही वैद्यकीय महाविद्यालये सुरू आहेत. आसामच्या 5 जिल्ह्यांमध्ये कर्करोग रुग्णालये सुरू करण्याच्या योजनेवरही वेगाने काम सुरू आहे. राज्याला 6 नवीन अभियांत्रिकी महाविद्यालये भेट दिल्याचे मोदींनी यावेळी सांगितले.
