नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर (हिं.स.) : देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी 4 डिसेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनात अनेक महत्त्वाची बिले सादर होण्याची शक्यता आहे.
हिवाळी अधिवेशनात अपेक्षित विधेयकांमध्ये भारतीय दंड संहितेतील (आयपीसी) बदलांशी संबंधित 3 विधेयकांव्यतिरिक्त, निर्मूलन आणि दुरुस्ती विधेयक 2022 आहे. यासोबतच पोस्ट ऑफिस बिल 2023, अधिवक्ता दुरुस्ती विधेयक, प्रेस आणि टर्म नोंदणी विधेयक, ज्येष्ठ नागरिक कल्याण विधेयक, घटना दुरुस्ती-एससी-एसटी आदेश आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या अधिकारांशी संबंधित विधेयक येण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासोबतच आगामी अधिवेशनात तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांचे निष्कासन होण्याची शक्यता आहे. महुआ मोईत्रांनी संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसा घेतल्याचा आरोप भाजप खासदारांनी केला होता. या प्रकरणी संसदेच्या आचार समितीने चौकशीसाठी मोईत्रा यांना बोलावले होते. परंतु, त्यांनी आचार समितीवर आरोप करत चौकशीतून काढता पाय घेतला होता. त्यामुळे आचार समितीने महुआ मोईत्रांची हकालपट्टी करण्याची शिफारस केलीय. त्यामुळे येत्या अधिवेशनात याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
हिंदुस्थान समाचार
