राफेल विमानांचे रविवारी मणिपूरच्या आकाशात उड्डाण
इम्फाल, 20 नोव्हेंबर (हिं.स.) : मणिपूरची राजधानी असलेल्या इम्फाल विमानतळावर रविवारी दुपारी अनआयडेन्टीफाइड फ्लाईंग ऑब्जेक्ट (युएफओ) दिसून आले. हवेत उडणारी अनोळखी वस्तू दिसल्यानंतर वायुसेनेने हे ‘युएफओ’ शोधण्यासाठी 2 राफेल जेट फायटर पाठवले होते. त्यानंतर ‘एअर डिफेन्स रिस्पॉन्स मेकॅनिझ्म प्रणाली’ (एडीआरएमएस) सक्रीय केली आहे.
यासंदर्भातील माहितीनुसार रविवारी दुपारी 2.30 वाजता इम्फालच्या विमानतळ परिसरात युएफओ दिसून आले. याची माहिती मिळताच इम्फाल विमानतळावरील प्रवासी विमानांची उड्डाणे प्रभावित झाली. काही विमानांच्या उड्डाणांची वेळ देखील बदलण्यात आली. यासंदर्भात माहिती मिळताच भारतीय वायूदलाच्या तळावरून एक राफेल लढाऊ विमान यूएफओच्या शोधात पाठवण्यात आले होते. अत्याधुनिक सेन्सर्स असलेल्या या विमानाने संशयित भागात यूएफओ शोधण्यासाठी उड्डाण केले. ज्या भागात यूएफओ दिसल्याची बातमी मिळाली होती, त्या भागात राफेलने शोधाशोध केली. परंतु, यूएफओ कुठेही सापडले नाही. यूएफओच्या शोधात पाठवण्यात आलेले पहिलं राफेल विमान परतल्यानंतर वायूदलाने आणखी एक राफेल विमान यूएफओच्या शोधात पाठवले. दुसऱ्या राफेल विमानाच्या पायलटलाही यूएफओ आढळून आले नाही. दरम्यान, संरक्षण अधिकारी यूएफओची महिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
वायूदलाच्या ईस्टर्न कमांडने ट्विटरवर (एक्स) संदेश पोस्ट केला की, भारतीय वायूदलाने इम्फाल विमानतळावरील यूएफओशी संबंधित व्हिडीओच्या आधारावर सुरक्षेसाठी एअर डिफेन्स रिस्पॉन्स मेकॅनिझ्म प्रणाली (एडीआरएमएस) सक्रीय केली आहे. परंतु, अशी कोणतीही उडणारी वस्तू आढळली नाही.
हिंदुस्थान समाचार
