लखनऊ, 18 ऑगस्ट (हिं.स.)। उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये टोल कर्मचाऱ्यांनी लष्करातील जवान कपिलला मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.यामध्ये टोल कर्मचारी कपिलला मारहाण करत असताना त्याचा भाऊ शिवम त्याला वाचवण्यासाठी आला, पण त्यालाही सोडण्यात आले नाही. दोघांनाही काठ्यांनी मारहाण करण्यात आली.या घटनेनंतर व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवून कारवाई केली असून ४ टोल कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
माहितीनुसार, राजपूत बटालियनमध्ये कार्यरत असलेला जवान कपिल कांवड यात्रेदरम्यान आपल्या गोटका गावात सुट्टीवर आला होता. सुट्टी संपल्यानंतर तो पुन्हा श्रीनगरला परत जात होता. टोलवर गर्दीमुळे त्याची टोल कर्मचाऱ्यांशी लवकर सोडण्याबाबत चर्चा झाली, आणि त्यातून वाद वाढत जाऊन थेट मारहाणीपर्यंत पोहोचला. ही घटना सरूरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या भूनी टोल प्लाझाची असल्याचे सांगितले जात आहे.
मेरठ ग्रामीणचे एसपी राकेश कुमार मिश्रा यांनी सांगितले की, जवान आणि त्याच्या भावावर हल्ला करणाऱ्या चार टोल कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी दोन पथके तयार करण्यात आली असून शोध मोहीम सुरू आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode
