आयझवाल, 04 डिसेंबर (हिं.स.) : पूर्वोत्तर भारतातील मिझोराम येथे आज, सोमवारी मतमोजणीला सुरूवात झाली. यात सकाळी 10 वाजेपर्यंत झोराम पिपल्स मुव्हमेंट (झेडपीएम) पक्ष विजयाच्या उंबरठ्यावर आहे. झेडपीएमचे 21 उमेदवार मतमोजणीत आघाडीवर असून त्याखालोखाल मिझो नॅशनल फ्रंटचे (एमएनएफ) 11 उमेदवार आघाडीवर आहेत.
मिझोराममध्ये गेल्या 7 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. राज्यात सुमारे 77.04 टक्के मतदानाची नोंद झाली होती. निवडणूक आयोगाच्या नियोजित वेळापत्रकानुसार 3 डिसेंबर रोजी इतर राज्यांसोबतच मिझोरामची मतमोजणी होणार होती. परंतु, मिझोराम एनजीओ कोऑर्डिनेशन कमिटीने रविवारी मतमोजणीला विरोध केला. या विरोधापुढे नमते घेत निवडणूक आयोगाने मिझोरामची मतमोजणी 4 डिसेंबरला करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज, सोमवारी मतमोजणीला सुरुवात झाली. यात सकाळी 10 वाजेपर्यंत झोराम पीपल्स मूव्हमेंटने 21 जागांवर आघाडी घेतली आहे. तर, मिझो नॅशनल फ्रंट 11 जागांसह दुसऱ्या स्थानावर आहे. काँग्रेसच्या 3 उमेदवारांनी आघाडी घेतली असून भाजपा चौथ्या स्थानावर जावे लागले. भाजपचा उमेदवार एका जागेवर आघाडीवर आहे.
हिंदुस्थान समाचार
