नवी दिल्ली , 5 ऑगस्ट (हिं.स.)।जम्मू-कश्मीर, गोवा, बिहार आणि मेघालयचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे मंगळवारी (५ ऑगस्ट) निधन झाले. त्यांनी ७९ व्या वर्षी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. सत्यपाल मलिक यांचे खाजगी सचिव के.एस. राणा यांनी ही माहिती दिली. सत्यपाल मलिक यांचे निधन भारतीय राजकारणासाठी एक मोठी हानी आहे.
सत्यपाल मलिक यांचे खाजगी सचिव के.एस. राणा यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिलं कि, राम मनोहर लोहिया रुग्णालयानुसार, आज दुपारी १.१० वाजता त्यांचे निधन झाले.
सत्यपाल मलिक हे बिहारचेही राज्यपाल राहिले होते. त्यांनी शेतकरी आंदोलन, भ्रष्टाचार आणि विविध राष्ट्रीय मुद्द्यांवर बेधडक मते मांडून नेहमीच चर्चेत राहिले. जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम ३७० आणि अनुच्छेद ३५अ हटवले गेले, तेव्हा सत्यपाल मलिक हेच त्यावेळीचे राज्यपाल होते. जेव्हा जम्मू-काश्मीरला संपूर्ण राज्याऐवजी केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात आले, तेव्हा सत्यपाल मलिक हे केंद्रशासित प्रदेशाचे पहिले उपराज्यपाल झाले.
२४ जुलै १९४६ रोजी सत्यपाल मलिक यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बागपत येथे झाला. त्यांनी मेरठ विद्यापीठातून विज्ञान शाखेत पदवी घेतली आणि एलएलबी (कायद्याची पदवी) पूर्ण केली. विद्यार्थीदशेपासूनच त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले.१९६८-६९ दरम्यान ते विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. १९७४ मध्ये ते प्रथमच विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर १९८० ते १९८६ आणि १९८६ ते १९८९ दरम्यान त्यांनी उत्तर प्रदेशमधून राज्यसभेचे प्रतिनिधित्व केले.
सत्यपाल मलिक हे राज्यसभेसह लोकसभेचेही सदस्य होते. १९८९ ते १९९१ या काळात त्यांनी जनता दलाच्या तिकिटावर अलीगडमधून ९वी लोकसभा जिंकली. १९९६ मध्ये समाजवादी पक्षाच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली, मात्र चौथ्या क्रमांकावर राहिले आणि ४०,७८९ मतांनी पराभूत झाले. २०१२ मध्ये त्यांची भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली.
सत्यपाल मलिक यांची वर्ष २०१२ मध्ये भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी भाजपाव्यतिरिक्त भारतीय क्रांती दल, जनता दल, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, लोकदल आणि समाजवादी पक्ष (सपा) यांसारख्या पक्षांमध्येही काम केले.
सत्यपाल मलिक सप्टेंबर २०१७ ते ऑगस्ट २०१८ या कालावधीत बिहारचे राज्यपाल होते.यानंतर २१ मार्च २०१८ ते २८ ऑगस्ट २०१८ दरम्यान त्यांनी ओडिशाचे प्रभारी राज्यपाल म्हणून काम पाहिले.२३ ऑगस्ट २०१८ ते ३० ऑक्टोबर २०१९ पर्यंत ते जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल होते.यानंतर ३ नोव्हेंबर २०१९ ते १८ ऑगस्ट २०२० या काळात ते गोव्याचे राज्यपाल आणि १८ ऑगस्ट २०२० ते ३ ऑक्टोबर २०२२ पर्यंत त्यांनी मेघालयचे राज्यपाल म्हणून जबाबदारी पार पाडली.
—————
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode
