सुरक्षा दलांनी उधळून लावले हिंसाचाराचे षडयंत्र
इम्फाल, 24 डिसेंबर (हिं.स.) : गेल्या 7 महिन्यांपासून धुमसणाऱ्या मणिपूरमध्ये सुरक्षा दलांनी हिंसाचाराचे मोठे षडयंत्र उधळून लावले आहे. आसाम रायफल्स आणि पोलिसांच्या संयुक्त मोहिमेत मोठा शस्त्रसाठा आणि दारूगोळा जप्त करण्यात आलाय.
यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार राज्यात पुन्हा हिंसाचार घडवण्यात येणार असल्याची गोपनीय माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानुसार आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलिसांनी संयुक्त तपासणी मोहिम हाती घेतली. यावेळी सुरक्षा दलांना नोनी जिल्ह्यातील कोबुरू रिज येथून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा आढळून आला. यात एक एके 56 रायफल, एक सिंगल बॅरल गन, दारूगोळा, सहा ग्रेनेड आणि युद्धात वापरला जाणारा दारूगोळा जप्त करण्यात आला. यापूर्वी 6 डिसेंबर रोजी, आसाम रायफल्सने सीमा सुरक्षा दल, भारतीय राखीव बटालियन आणि चुराचंदपूर पोलिस यांच्यासमवेत संयुक्त घेराव आणि शोध मोहिमेत चुराचंदपूर जिल्ह्यातील डी हाओलेंजंग गावाच्या सीमेवर शस्त्रे आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त केला होता.
या महिन्याच्या सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने मणिपूर सरकारला जातीय हिंसाचारात नष्ट झालेली प्रार्थनास्थळांचा पुनर्निर्माण करण्यासाठी उचललेल्या पावलांचा तपशील न्यायालय-नियुक्त समितीला देण्यास सांगितले होते. त्यानुसार राज्य प्रशासन काम करित असताना मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकवण्याच्या दृष्टीने कट रचला जात असल्याचे चित्र आहे.
हिंदुस्थान समाचार
