एनसीआरबीच्या अहवालात पुढे आली माहिती
नवी दिल्ली, 05 डिसेंबर (हिं.स.) : देशातील एकूण गुन्हागारीत घट झाली असली तर बालके आणि स्त्रियांच्या संदर्भातील गुन्ह्यात वाढ झाली आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो-2022 (एनसीआरबी) अहवालातून ही माहिती पुढे आलीय.
एनसीआरबीच्या अहवालानुसार देशात 2022 मध्ये एकूण 58,24,956 गुन्हे दाखल झाले. यापूर्वी 2021 मध्ये 60,96,310 गुन्हे दाखल झाले होते. देशात 2021 च्या तुलनेत 2022मध्ये गुन्ह्यात 4.5 टक्के घट झाली आहे. परंतु, आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. धक्कादायक म्हणजे कोरोनानंतर अचानक होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 11.6 टक्क्यांनी वाढले. देशात आत्महत्येचे प्रमाण 4.2 टक्के वाढले. भारतात2022 मध्ये 13 हजार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. परीक्षेतील अपयश हे कारण आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 378 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. मध्य प्रदेश-277 आणि झारखंडमध्ये 174 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली.
देशात महिला अत्याचाराच्या प्रमाणात 4 टक्के वाढ नोंदवण्यात आली. देशात दर तासाला महिलांविरुद्ध 51 गुन्हे घडतात. 2022 मध्ये असे 4.45 लाख गुन्हे दाखल झाले. 2021च्या तुलनेत त्यात 4 टक्के वाढ आहे. यामध्ये 19.2 टक्के अपहरण व 7 टक्के अत्याचाराचे गुन्हे आहेत. महिलांच्या संदर्भातील अत्याचाराच्या एकूण 31 हजार 516 घटनांपैकी सर्वाधिक 5399 घटना राजस्थानातील आहेत. त्याखालोखाल उत्तरप्रदेशात 3690 आणि मध्यप्रदेशात महिला अत्याचाराच्या 3029 प्रकरणांची नोंद करण्यात आली.
हिंदुस्थान समाचार
