लखनऊ, 15 जानेवारी (हिं.स.) : बहुजन समाज पक्ष (बसप) आगामी लोकसभा निवडणूक स्वःबळावर लढणार असल्याची घोषणा पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी आज, सोमवारी केली. मायावती यांचा आज, वाढदिवस असून त्यानिमित्ताने संवाद साधताना त्यांनी देशातील विरोधी पक्षांची आयएनडीआयए आणि सत्ताधारी एनडीए आघाडी यापैकी कुणासोबतही निवडणुकीत युती करणार नसल्याचे स्पष्ट केलेय.
लखनऊ येथे आयोजित पत्रकार परिषदेत मायावती म्हणाल्या की, युतीमुळे फायदा कमी आणि तोटा जास्त होतो. ‘लोकसभा निवडणुकीसाठी कठोर परिश्रम आवश्यक आहेत. लोकसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार. एकटेच लढणार. अनेक पक्षांना बसपासोबत युती करायची आहे. मात्र आम्ही सर्व पक्षांपासून अंतर राखू. मात्र, निवडणुकीनंतर ते सरकारमध्ये सहभागी होऊ शकतात.इतर पक्षांना युतीत बसपाची मते मिळतात, पण आम्हाला मिळत नाहीत. 1993 आणि 1996 मध्ये सपा आणि काँग्रेसला बसपा युतीचा फायदा झाला. बसपने 2002 मध्ये एकट्याने निवडणूक लढवून 100 जागा जिंकल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सरकारवर टीका करताना मायावती म्हणाल्या की, जातीवादी संकुचित विचारसरणीचा फायदा सर्वांनाच होत नाही. थोडा शिधा देऊन त्यांना गुलाम आणि निराधार बनवले जात आहे. केंद्र आणि राज्य सरकार धर्म आणि जातीच्या नावावर राजकारण करत आहे. काँग्रेस, भाजप आणि मित्रपक्षांची विचारसरणी जातीयवादी आणि हुकूमशाही आहे. एससी/एसटी प्रवर्गाला आरक्षणाचा लाभ मिळत नाही. बहुजन समाजातील सर्व घटकांनी बसपासोबत सत्तेपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या राजकीय वाटचालीबद्दल मायावती म्हणाल्या की, गेल्या महिन्यात मी पुतण्या आकाश आनंदला माझा उत्तराधिकारी म्हणून घोषित केले होते. यानंतर मी राजकारणातून लवकरच संन्यास घेणार असल्याची चर्चा मीडियात होती. पण या चर्चेत अर्थ नसल्याचे त्यांनी सांगितले.
राम मंदिराच्या मुद्यावर मयावतींनी सांगितले की, ‘मला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळाले आहे, त्यावर मी कोणताही निर्णय घेतलेला नाही. कारण मी माझ्या पक्षाच्या कामात व्यस्त आहे. मात्र 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या कार्यक्रमाचे आम्ही स्वागत करतो. भविष्यात बाबरी मशिदीबाबत असा काही कार्यक्रम झाला तर त्याचेही स्वागत करू. आमचा पक्ष धर्मनिरपेक्ष आहे, आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो असे त्यांनी स्पष्ट केले.
हिंदुस्थान समाचार
