देवबंदच्या मदरशातून आरोपी तरुणाला घेतले ताब्यात
साहरणपूर, 27 डिसेंबर (हिं.स.) : उत्तरप्रदेशच्या देवबंद मदरशातील मोहम्मद तल्हा मजहर नामक तरुणाने देशात पुलवामा सारखा दुसरा हल्ला होईल अशी धमकी दिलीय. याबाबत त्याने ट्विटरवर (एक्स) पोस्ट केली होती. याची माहिती मिळताच साहरणपूर पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक करून गुन्हा दाखल केलाय.
उत्तरप्रदेशच्या सहारणपूरमध्ये एका तरुणाने पुलवामासारख्या हल्ल्याची धमकी दिली. त्यांनी ही धमकी ट्विटरवर (एक्स) पोस्ट केली होती. मोहम्मद तल्हा मजहर असे या माथेफिरूचे नाव आहे. मोहम्मद तल्हा मजहर हा झारखंडच्या जमशेदपूर येथील रहिवासी आहे. तो देवबंदच्या मदरशात इस्लामिक शिक्षण घेण्यासाठी आलाय. त्याने सोशल मिडीयावर धमकीची पोस्ट अपलोड केली होती. यात लिहीले होते की, लवकरच इंशाअल्लाह आणखी एक पुलवामा होणार आहे. ही धमकीची पोस्ट समोर आल्यानंतर उत्तरप्रदेश एटीएससह इतर गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या.
त्यानंतर देवबंदच्या खनकाह पोलीस चौकीच्या पथकाने त्याला अटक केली. पोलिसांनी सांगितले की, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर मदरशातील विद्यार्थ्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची चौकशी करून माहिती गोळा केली जात आहे. या प्रकरणाचा तपास गांभीर्याने सुरू आहे.
हिंदुस्थान समाचार
