
* शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना अटक
नाशिक, ७ ऑक्टोबर (हिं.स.) – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नाशिक दौऱ्यामध्ये कार्यक्रमाला जात असताना शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून वणी येथे टोमॅटो आणि कांदा फेकून निषेध व्यक्त करण्यात आला. ही घटना घडल्यानंतर सरकारी यंत्रणांची एकच धावपळ उडाली. तातडीने पोलिसांनी कांदा व टोमॅटो फेकणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे.
मागील काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील शेतीमालाचा भाव हा प्रश्न अतिशय ज्वलंत होत आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांमध्ये शासनाच्या विरोधात तसेच शासनकर्त्यांच्या विरोधात तीव्र भावना निर्माण झालेले आहेत. मधल्या काळामध्ये 14 दिवस कांद्याचा प्रश्न पेटला आणि व्यापाऱ्यांचा संपत्तीतील त्यामुळे उभा राहिला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागला, तर टोमॅटोचे भाव अचानक पडल्यामुळे शेतकऱ्यांना टोमॅटो रस्त्यावरती फेकण्याची वेळ आली. यासह जिल्ह्यात उत्पादन होणाऱ्या फ्लावर पालेभाज्या यासह अन्य भाजांच्या दरातही सातत्याने भाव कोसळत असल्यामुळे नाशिक जिल्ह्याची शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्याच्याच फटका हा राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते अजित पवार यांना बसला.
याबाबत अधिक माहिती अशी की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवारी नाशिक दौऱ्यावरती आले होते. ओझर विमानतळावरती त्यांच्या सकाळी साडेदहा वाजता आगमन झाल्यानंतर त्यांनी आपले नियोजित कार्यक्रमाप्रमाणे कळवण्याचे कार्यक्रमाला जात असताना हे वणी गावातील चौफुलीजवळ आले असता अचानक शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष संतोष रेहरे तसेच श्याम हिरे या दोन कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे राहून एकाने टोमॅटो आणि एकाने कांदा फेकून आपल्या आणि शेतकऱ्यांचा असणारा राग व्यक्त केला. ही घटना अचानक घडल्यानंतर सरकारी यंत्रणांची चांगलीच पळापळ झाली. तातडीने ताफा थांबविण्यात आला आणि पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले. त्यानंतर हा ताफा पुढे गेला. यावर अजित पवार यांनी तातडीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
हिंदुस्थान समाचार
