– महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते 1.5 लाख रुपयांचे बक्षीस
– दोन वर्षांत एकुण 73 माओवाद्यांना अटक
गडचिरोली, 10 डिसेंबर (हिं.स.) – टिटोळा (ता.एटापल्ली, जि.गडचिरोली) येथील पोलीस पाटील लालसु वेळदा यांच्या हत्येमधील आरोपी जहाल जनमिलिशिया उर्फ अर्जुन सम्मा हिचामी (19) याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
जनमिलिशिया उर्फ अर्जुन सम्मा हिचामी हा पोलीस ठाणे गट्टा (जां.) हद्दीत गट्टा नाल्याजवळ पोलीस पार्टीच्या हालचालींबाबतची माहिती देण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे विशेष अभियान पथकाचे जवान आणि पोलीस ठाणे गट्टा (जां.) पोलीस पार्टीच्या जवानांनी माओवाद विरोधी अभियान राबवून त्यास अटक केली. अधिक तपासात असे दिसून आले की, 23 नोव्हेंबर 2023 रोजी टिटोळा गावातील युवकांच्या रोजगारासाठी झटणाऱ्या पोलीसांचा खबरी असल्याच्या कारणावरुन माओवाद्यांकडून पोलीस पाटलाच्या करण्यात आलेल्या हत्येमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. सदर घटनेच्या काही दिवसापुर्वी त्याने माहिती आणि ठावठिकाणा हा माओवाद्यांना सांगितला होता. तसेच पोस्टे गट्टा (जां.), हेडरी आणि सुरजागड भागातील सुरक्षा जवानांच्या हालचालींवर तो बारीक लक्ष ठेवून होता. तसेच फेब्रुवारीच्या उत्तरार्धात व मार्च महिन्याच्या सुरुवातीला विसामुंडी आणि अलेंगा येथील बांधकाम उपकरणांच्या जाळपोळ प्रकरणातही त्याचा सक्रीय सहभाग होता.
त्यास पोस्टे गट्टा (जां.) ता,एटापली जि. गडचिरोली येथे दाखल अप. क्र. 76/2023 कलम 302, 36 ड 4, 143, 147, 148,149, 120-ब भादंवी, 3/25 भारतीय हत्यार कायदा, 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्ह्यात अटक करण्यात आली. तसेच टिटोळा पोलीस पाटलाच्या हत्येमधील अटक करण्यात आलेला तो पहिला आरोपी आहे.
अटक जहाल जनमिलिशिया बाबत माहिती – अर्जुन सम्मा हिचामी, दलममधील कार्यकाळ पाहिल्यास 2021 पासुन तो झारेवाडा आणि आजुबाजुच्या भागात कार्यरत आणि सक्रीय होता, येत्या काही दिवसात पेरमिली दलममध्ये सदस्य पदावर सामील होण्याची त्याची योजना होती.
त्याच्यावर जाळपोळीचे 2 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये फेब्रुवारी 2022 मध्ये विसामुंडी गाव आणि मार्च 2023 मध्ये झालेल्या अलेंगा-पुरसाळगोंडी गावात झालेल्या जाळपोळीमध्ये त्याचा सहभाग होता. तसेच नोव्हेंबर 2023 रोजी टिटोळा गावातील पोलीस पाटील लालसु टिंगरा वेळदा या निरपराध इसमाच्या हत्येमध्ये सहभाग होता.
महाराष्ट्र शासनाने अर्जुन सम्मा हिचामी याच्यावर 1.5 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 73 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी एम. रमेश यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच पोलीस अधीक्षक यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.
(हिंदुस्थान समाचार)
