स्फोटाचा परिसरातील 5 घरांनाही बसला फटका
बेंगळुरू, 16 जानेवारी (हिं.स.) : कर्नाटकच्या बेंगळुरूमध्ये आज, मंगळवारी एलपीजी सिलेंडरचा स्फोट होऊन 6 जण जखमी झाले. शहराच्या येलहंका येथील लाल बहादूर शास्त्री लेआऊटमधील एका घरात ठेवलेल्या सिलिंडरचा स्फोट होऊन शेजारच्या 5 घरांनाही फटका बसला. येलहंका पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. वासिया बानो सलमा शहीद अस्मा आणि अफरोज अशी जखमींची नावे आहेत.
यासंदर्भात माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, येलहंका येथील लाल बहादूर शास्त्री ले-आऊटमधील एका घरात ठेवलेला सिलेंडरचा आज, मंगळवारी सकाळी स्फोट झाला. त्यामुळे शेजारच्या 5 घरांनाही याचा फटका बसला. या घटनेत एकूण 6 जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना स्थानिक व्हिक्टोरिया रुग्णालयात हलवण्यात आले आहे. इतर जखमी रुग्णांवर सध्या येलहंका शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वासिया बानू, सलमा, शहीद, अस्मा आणि अफरोज अशी पाच जखमींची नावे आहेत. सहाव्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. येलहंका न्यू टाऊन पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
हिंदुस्थान समाचार
