छत्तीसगड येथून बुधवारी केली होती अटक
लखनऊ, 09 नोव्हेंबर (हिं.स.) : उत्तरप्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने आयएसआयएसच्या संशयित दहशतवाद्याला बुधवारी छत्तीसगडच्या भिलाई येथून अटक केलीय. वजीहुद्दीन असे त्याचे नाव आहे. त्याला ट्रांझिट रिमांडवर लखनऊला नेण्यात आले असून तेथे त्याची कसून चौकशी सुरू आहे.
अलीगड मुस्लीम युनिव्हर्सिटीतून पीएच.डी. करणारा वजीहुद्दीन हा आयएसआयएस या दहशतवादी संघटनेचा मोहम्मद रिजवान याच्या संपर्कात होता. याबाबत माहिती मिळताच उत्तरप्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने वजीहुद्दीनचा शोध सुरू केला. तो मुळचा छत्तीसगड येथील रहिवासी असल्यामुळे स्थानिक पोलिसांच्या मदतीने युपी-एटीएसने त्याचा माग काढला. छत्तीसगडच्या भिलाई शहरातील एसबीआय कॉलनीतील खोली क्रमांक 127/8 मध्ये वजीहुद्दीन गुपचूपपणे राहात होता. एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, वजीहुद्दीचा आयएसआयएसशी थेट संपर्क असून यापूर्वीच त्याच्या काही साथीदारांना देशविरोधी कृत्यात अटक करण्यात आलीय. वजीहुद्दीनला अटक केल्यानंतर ट्रान्झिट रिमांडवर त्याला उत्तरप्रदेशला नेण्यात आले. याठिकाणी त्याची कसून चौकशी सुरू आहे. मोहम्मद रिजवानशी कसा संपर्क आला…? कोचिंग सेंटरच्या विद्यार्थ्यांना वजीहुद्दीनने जाळ्यात ओढले आहे का ..? अशा विविध अँगलने त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली.
हिंदुस्थान समाचार
