आदिलाबाद, २८ नोव्हेंबर, (हिं.स)- तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला आहे. निवडणुकीच्या प्रचारार्थ आदिलाबाद येथे मातंग समाजाची रॅली काढण्यात आली. या रॅलीत महाराष्ट्रातील भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर हे सहभागी झाले होते. आदिलाबाद शहराचा विकास करायचा असेल तर भाजपा उमेदवार पायल शंकर अण्णा यांना निवडून आणा, असे आवाहन दरेकर यांनी यावेळी केले.
याप्रसंगी महाराष्ट्रातील मंत्री संजय राठोड, खासदार हेमंत पाटील, आदिलाबादचे भाजपा उमेदवार पायल शंकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी रॅलीत उपस्थितांना संबोधीत करताना दरेकर म्हणाले की, आज जी रॅली झाली त्यात तुमच्या मातंग समाजाने, आदिलाबादच्या जनतेने निश्चय केला आहे की येथील आमदार पायल शंकर आण्णाच होणार. निवडणुकीचे वातावरण पूर्ण बदलून गेले आहे. गेल्या १५-२० दिवसापासून मी येथे प्रचारासाठी आहे. प्रत्येक गावात, शहरात प्रचारासाठी जातो. तेथीक जनता सांगतेय ”अब की बार पायल शंकर अण्णा” यांनाच आमदार म्हणून निवडून आणणार. याचे कारण जे भाजपाचे उमेदवार आहेत, त्या पक्षाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करताहेत. जगात आज सर्वात शक्तिशाली देश म्हणून भारत समोर आला आहे त्याचे कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. तेलंगणाचा विकास करायचा असेल तर भाजपाला सरकार बनवण्याची संधी द्या. तसेच ज्या ज्या लोकांना आमदार केले त्यांनी या शहराला, मातंग समाजाला काय दिले? ते देण्याचे काम पायल शंकर अण्णा करणार आहे. येथे बेरोजगारांसाठी रोजगार हवाय, आदिलाबाद येथे विकास हवा आहे तर एकच पर्याय आहे भाजपा आणि पायल शंकर अण्णा, असे आवाहनही दरेकर यांनी रॅलीवेळी केले.
हिंदुस्थान समाचार
