दीपोत्सवाच्या जगमगाटात न्हाऊन निघाली रामनगरी
अयोध्या, 11 नोव्हेंबर (हिं.स.) : रामनगरी अयोध्येत आज, शनिवारी आयोजित दीपोत्सवाच्या निमित्ताने शरयू नदीच्या काठावरील 51 घाटांवर 22 लाख 23 हजार दिपे प्रज्ज्वलीत करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रकॉर्डमध्ये विक्रम प्रस्थापित करण्यात आला. यावेळी महर्षी वाल्मिकी यांनी होलोग्राफिक प्रकाशाद्वारे रामाची कथा सांगितली. तसेच लेझर-शो देखील आयोजित करण्यात आला होता. यासोबतच 84 लाख रुपयांच्या हरित फटाक्यांची 23 मिनिटे आतषबाजी करण्यात आली.
अयोध्येतील दीपोत्सवासाठी 1 लाख 5 हजार लिटर मोहरीच्या तेलाचा वापर करण्यात आला. या कार्यक्रमासाठी 54 देशांचे राजदूतही पोहोचले होते. दिवे मोजण्यासाठी 8 ड्रोन वापरण्यात आले. सरयूच्या काठावर गेल्या वेळी 15 लाख 76 हजार दिवे लावण्याचा विक्रम करण्यात आला होता. तत्पूर्वी सकाळी श्रीरामांच्या अयोध्येत आगमनाचे प्रतीक असलेली भव्य मिरवणूक काढण्यात आली. दुपारी प्रभू राम, माता सीता आणि लक्ष्मण पुष्पक विमानाने (हेलिकॉप्टर) अयोध्येला पोहोचले. राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी यांनी सर्वांचे स्वागत केले. यानंतर प्रभू राम यांना रामकथा उद्यानात आणण्यात आले. येथे प्रभू रामांचा राज्याभिषेक झाला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रामांचे राजतिलक केले.
अयोध्येत आज, शनिवारी 19 शोभायात्रा काढण्यात आल्या. प्रभू रामाचा जन्म ते त्यांच्या राज्याभिषेकापर्यंतचा प्रवास चित्रकारांच्या माध्यमातून दाखवण्यात आला आहे. यामध्ये रामायण काळातील शिक्षण, दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत लोकसांस्कृतिक कार्यक्रम, सुरक्षा, भयमुक्त समाज, मुलांचे हक्क, मूलभूत शिक्षण, राम-सीता विवाह, मुलींच्या विवाहासाठी सरकारकडून करण्यात येत असलेली व्यवस्था, मिशन शक्ती, महिलांची सुरक्षा, महिलांच्या सन्मानाचे संदेश, महिला हेल्पलाइन क्रमांक, वन आणि पर्यावरण, रामेश्वरम पूल, पुष्पक विमान, उत्तम विमान प्रवास कनेक्टिव्हिटी, केवट घटना, उत्तम कायदा व सुव्यवस्था, शबरी-राम मिलाप, लंका दहन, भू-माफियांवर कारवाई इत्यादीचा समावेश होता.
याप्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले की, अयोध्येत 2017 मध्ये दीपोत्सव कार्यक्रम सुरू झाला तेव्हा लोकांचा उत्साह पाहून प्रत्येकाची एकच इच्छा असल्यासारखे वाटले. त्यावेळी अयोध्येतील जनतेतून आवाज आला की, एक काम करा आणि मंदिर बांधा. उत्तर प्रदेशातील लोकांच्या उत्साहाची परीक्षा घेण्याची वेळ आज निघून गेली आहे. प्रभू रामाच्या 14 वर्षांच्या वनवासाच्या आठवणी अविस्मरणीय व्हाव्यात यासाठी आज अयोध्येत दीपोत्सव साजरा करण्यात येत असल्याचे योगी आदित्यनाथ म्हणाले. आगामी 22 जानेवारी 2024 रोजी तब्बल 500 वर्षांच्या संघर्षानंतर मंदिरात श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होईल. राज्य सरकारकडून अयोध्या धाममध्ये तीस हजार 500 कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू आहेत. खाजगी हे क्षेत्र वेगळे आहे. जोपर्यंत राम लल्ला अयोध्येत बसतील, तोपर्यंत 50 हजार कोटी रुपयांच्या योजना येथे आकाराला येताना दिसतील. यामुळे येथे रोजगाराच्याही भरपूर संधी उपलब्ध होतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार
