
मुंबई, 21 जानेवारी (हिं.स.) – आशियातील सर्वांत मोठी आणि बहुचर्चित टाटा मुंबई मॅरेथॉन आज (रविवारी) मोठ्या उत्साहात पार पडली. यातील मुख्य मॅरेथॉन भारतीय पुरुष गटात श्रिनु बुगाथाने अव्वल स्थान पटकावलं, तर पूर्ण मॅरेथॉन पुरुष गटात इथोपिआच्या हायली लेमी आणि पूर्ण मॅरेथॉन महिला गटात अबेराश मिनसिवोने बाजी मारली आहे.
टाटा मुंबई मॅरेथॉनला पहाटे सव्वा पाच वाजल्यापासून राज्यपाल रमेश बैस, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या उपस्थित मॅरेथॉनला सुरुवात झाली. यामधील ४२.१९५ किलो मीटरची मुख्य मॅरेथॉन ही पहाटे ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरू झाली होती. २१.०९७ किलोमीटरची अर्ध मॅरेथॉन ही पहाटे ५ वाजता माहीम रेतीबंदर, माहीम कॉजवे इथून सुरू झाली होती. तर १० किलो मीटरची मॅरेथॉन सकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून सुरू झाली. या मॅरेथॉनसाठी संपूर्ण मुंबईनगरीसह सहभागी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय धावपटू सुद्धा सज्ज झाले. ऑलिम्पिक पदक विजेती आणि दोन वेळची जगज्जेती पोल व्हॉल्ट पटू केटी मून ही या टाटा मुंबई मॅरेथॉन २०२४ ची आंतरराष्ट्रीय ॲम्बेसेडर राहिली. या मॅरेथॉनमध्ये एकूण ५९,५१५ स्पर्धकांनी भाग घेतला. मॅरेथाॅनचं यंदाचं १९ वे वर्ष होते. मॅरेथॉन स्पर्धेत फुल मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन, १० किमी मॅरेथॉन, फुल मॅरेथॉन एलिट चॅम्पियन्स विथ डिसेबिलिटी, रन सीनियर सिटीझन रन आणि ड्रीम रन असे सात प्रकार असतात.
टाटा मुंबई मॅरेथॉन २०२४ : विजेते पूर्ण मॅरेथॉन (पुरुष) – हायली लेमी (इथोपिआ), हेमानॉट अल्यू (इथोपिआ), मित्कु तफा (इथोपिआ)
पूर्ण मॅरेथॉन (महिला) – अबेराश मिनसिवो (इथोपिआ), मूलूअबट तेसगा (इथोपिआ), मेधिन बेजेनी (इथोपिआ)
टाटा मुंबई हाफ मॅरेथॉन विजेते (२१.०९७ किलो मीटर) : प्रथम क्रमांक : सावन बरवाल – १ तास ५ मिनटे ७ सेकंद, द्वितीय क्रमांक : किरण म्हात्रे – १ तास ६ मिनटे २३ सेकंद, तृतीय क्रमांक : मोहन सैनी – १ तास ६ मिनटे ५५ सेकंद, विशेष म्हणजे हे तीनही विजेते इंडियन आर्मीमध्ये कार्यरत आहेत.
महिला हाफ मॅरेथॉन विजेते २१.९७ किमी : प्रथम क्रमांक : अमरीता पटेल – १ तास १९ मिनटे २० सेकंद, द्वितीय क्रमांक : पूनम दिनकर – १ तास १९ मिनटे २० सेकंद, तृतीय क्रमांक : कविता यादव – १ तास २० मिनटे ४५ सेकंद
हिंदुस्थान समाचार
