कोलंबो, 22 ऑगस्ट (हिं.स.) – सरकारी निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विक्रमसिंघे हे २०२२ ते २०२४ या कालावधीत श्रीलंकेचे राष्ट्रपती होते. त्यांच्या कार्यकाळात श्रीलंकेत सत्तापालटाची परिस्थिती निर्माण झाली होती. सप्टेंबर २०२३ मध्ये विक्रमसिंघे राष्ट्रपती असताना त्यांच्या पत्नीच्या ब्रिटीश विद्यापीठात झालेल्या समारंभात सहभागी होण्यासाठी लंडनला गेले होते, यासाठी त्यांनी सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप विक्रमसिंघे यांच्यावर आहे. याच प्रकरणाच्या चौकशीसाठी विक्रमसिंघे आज कोलंबो येथील गुन्हे अन्वेषण विभागात (सीआयडी) सुरू असलेल्या चौकशीसंदर्भात त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी दाखल झाले होते. त्यावेळी चौकशीअंती रानिल यांना अटक करण्यात आली आहे.
सीआयडीच्या तपासात असा दावा करण्यात आला आहे की, माजी राष्ट्रपतींसोबत दहा जणांचा ताफा होता आणि या प्रवासात सरकारला सुमारे १६.९ दशलक्ष रुपये खर्च आला. त्यावेळी विक्रमसिंघे क्युबा आणि अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर होते आणि त्यांनी अमेरिकेपासून युकेपर्यंतचा प्रवास खाजगी दौरा म्हणून केला होता, असेही उघड झाले आहे. विक्रमसिंघे हे अलिकडच्या काळात अटक झालेले सर्वात वरिष्ठ राजकीय व्यक्ती आहेत.
—————
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी
