वॉशिंग्टन, 15 ऑगस्ट (हिं.स.)।अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दावा केला आहे की, त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष टाळला होता. ट्रम्प यांच्या मते, हा संघर्ष अणुयुद्धातही रूपांतरित होऊ शकला असता. ट्रम्प म्हणाले की, त्या वेळी परिस्थिती इतकी बिघडली होती की ६-७ विमाने पाडली गेली होती. याआधी ट्रम्प यांनी ५ विमाने पाडल्याचा दावा केला होता, पण आता ते ६ किंवा ७ विमानांबद्दल बोलत आहेत कारण भारतीय वायूदलाने आधीच स्पष्ट केलं आहे की त्यांनी पाकिस्तानच्या ५ फायटर जेट्ससह ६ विमाने पाडली होती.
गुरुवारी (दि.१४), ओव्हल ऑफिसमध्ये मीडियाशी बोलताना ट्रम्प म्हणाले, “जर तुम्ही पाकिस्तान आणि भारताकडे पाहिलं, तर विमाने एकामागोमाग एक पाडली जात होती. ६ किंवा ७ विमाने पाडण्यात आली. परिस्थिती इतकी तणावपूर्ण होती की अणुयुद्धही होऊ शकले असते, पण आम्ही ते थांबवलं.”
ट्रम्प पुढे म्हणाले, “गेल्या सहा महिन्यांत मी सहा युद्धं थांबवली आहेत. त्यातील एक ३७ वर्षांपासून, तर एक अफ्रिकेत ३१ वर्षांपासून सुरू होतं. मी केवळ युद्ध थांबवलं नाही, तर शांती प्रस्थापित केली. भारत-पाकिस्तानचं प्रकरण देखील त्याचाच एक भाग होतं.”
ट्रम्प यांचा हा विधान त्या वेळी आला आहे जेव्हा ते अलास्कामध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी भेटण्याच्या तयारीत होते. या भेटीकडे ते सकारात्मकपणे पाहत आहेत, पण त्यांनी असंही म्हटलं की खरी महत्त्वाची भेट तेव्हाच होईल, जेव्हा पुतीन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की समोरासमोर बसतील.
दरम्यान, बंगळुरूमधील एका कार्यक्रमात भारतीय वायुदल प्रमुखांनी पहिल्यांदाच अधिकृतपणे ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानला झालेल्या मोठ्या नुकसानीची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की, भारतीय एस-४०० एअर डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानची किमान ५ फायटर जेट्स पाडली होती. त्याचबरोबर पाकिस्तानचं एक AWACS विमानही पाडण्यात आलं होतं. हे सर्व ३०० किमी अंतरावरून करण्यात आले.
आयएएफ प्रमुखांनी ऑपरेशनपूर्वी आणि नंतरच्या सॅटेलाइट प्रतिमा सुद्धा दाखवल्या. त्यामध्ये स्पष्टपणे दिसून आलं की टार्गेट अतिशय अचूकतेने हिट करण्यात आलं होतं. जैश-ए-मोहम्मदचं बहावलपूर येथील मुख्यालय पूर्णतः नष्ट झालं, पण आजूबाजूच्या इमारतींना कोणतीही हानी पोहोचली नाही.
—————
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode
