वॉशिंग्टन, 21 सप्टेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा अफगाणिस्तानला इशारा दिला आहे. जर अफगाणिस्तानने बगराम एअरबेसचे नियंत्रण अमेरिकेला परत दिले नाही, तर त्याचे गंभीर परिणाम होतील.असा इशारा ट्रम्प यांनी अफगाणिस्तानला दिला आहे.
ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टूथ सोशल वर लिहिले, “जर अफगाणिस्तानने बगराम एअरबेस त्यांच्याकडे परत दिले नाही ज्यांनी ते उभारले आहे ( म्हणजे अमेरिकेला)तर वाईट परिणाम होतील.”
ट्रम्प यांनी यापूर्वीही सांगितले होते की, 11 सप्टेंबर 2001 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकन सैन्याने वापरलेला हा बेस पुन्हा अमेरिकेच्या ताब्यात यावा अशी त्यांची इच्छा आहे. शुक्रवारी (19 सप्टेंबर) पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, या मुद्द्यावर अफगाण अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे.
2021 मध्ये अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानमधून पूर्णपणे बाहेर पडल्यावर, बगराम एअरबेस तालिबानच्या ताब्यात गेला होता.
दरम्यान, अफगाण अधिकाऱ्यांनी पुन्हा अमेरिकन सैन्याची उपस्थिती होण्यास विरोध दर्शवला आहे. अफगाण परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी जाकिर जलाल यांनी एक्सवर लिहिले की, “अफगाणिस्तान आणि अमेरिकेमध्ये संवाद व्हायला हवा, पण अमेरिकेला अफगाणिस्तानच्या कुठल्याही भागात सैन्य ठेवण्याची गरज नाही.”
ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांच्याशी झालेल्या बैठकीत ट्रम्प यांनी सांगितले की, त्यांचे प्रशासन बगराम एअरबेस परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.त्यामागचे मुख्य कारण म्हणजे हा बेस चीनच्या अण्वस्त्र प्रकल्पांच्या अगदी जवळ आहे. ट्रम्प यांनी हे देखील सांगितले की, माजी अध्यक्ष जो बायडेन यांच्या कार्यकाळात अमेरिकन सैन्याची माघार ही एक संपूर्ण आपत्ती होती.
ट्रम्प म्हणाले, “आम्ही तो बेस परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला तो बेस हवा आहे कारण अफगाण अधिकाऱ्यांना आमची गरज आहे. आणि यामागचं एक कारण हेही आहे की, हा बेस चीनच्या अण्वस्त्र निर्माण स्थळापासून फक्त एका तासाच्या अंतरावर आहे.”
—————
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode
