तेहरान, 09 फेब्रुवारी (हिं.स.)।इराणने नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या नरगिस मोहम्मदी यांना साडेसात वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहेत. इराणी सरकार आणि नरगिस मोहम्मदी यांच्यात गेल्या अनेक दशकांपासून संघर्ष सुरू आहे. रविवारी मोहम्मदी यांच्या वकिलांनी हि शिक्षा जाहीर केली. त्यांच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, या शिक्षेमुळे इराणी अधिकाऱ्यांविरुद्ध सुरू असलेली त्यांची दीर्घकालीन लढाई आणखी तीव्र झाली आहे.
१२ डिसेंबर २०२५ रोजी, मशहद येथे मानवाधिकार वकील खोसरो अलीकोर्डी यांच्या स्मरणार्थ आयोजित शोकसभेत सहभागी झाल्यानंतर नरगिस मोहम्मदी यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर भडकावू भाषणे, नियमभंग करणारे घोषवाक्य आणि शांतता भंग केल्याचे आरोप ठेवण्यात आले.मोहम्मदी यांनी त्यांच्या नव्या शिक्षेची घोषणा झालेल्याच दिवशी एक आठवड्याची उपोषणाची समाप्ती केली.
५३ वर्षांच्या नरगिस मोहम्मदी या एक प्रसिद्ध इराणी मानवाधिकार कार्यकर्त्या आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या आहेत. इराणमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात आणि राजकीय दडपशाहीविरोधात लढा देण्यासाठी त्या ओळखल्या जातात.इराणी अधिकाऱ्यांचा आरोप आहे की त्यांनी निदर्शने आयोजित केली आणि राज्याविरुद्ध प्रचार (प्रोपगंडा) केला. मात्र नरगिस मोहम्मदी आणि त्यांच्या समर्थकांनी हे आरोप फेटाळून लावले असून, शांततामय सक्रियतेसाठीच त्यांना शिक्षा दिली जात असल्याचे ते म्हणतात. नरगिस मोहम्मदी या अभियंता आणि लेखिका असून, मानवाधिकार रक्षक केंद्र (DHRC) यांच्या उपाध्यक्षही आहेत. या संस्थेची स्थापना नोबेल पुरस्कार विजेत्या शिरीन एबादी यांनी केली होती. गेल्या दहा वर्षांपैकी बहुतांश काळ नरगिस यांनी तुरुंगात घालवला आहे.
नरगिस फाउंडेशनच्या माहितीनुसार, या नव्या निकालानंतर त्यांच्या विरोधात ठोठावलेली एकूण कारावासाची शिक्षा ४४ वर्षांपर्यंत पोहोचली आहे. २०२१ पासून त्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आरोपांखाली १३ वर्षांची शिक्षा भोगत आहेत. इराणमधील महिलांवरील अत्याचारांविरोधातील लढा आणि सर्वांसाठी मानवाधिकार व स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्यासाठी त्यांना २०२३ मध्ये नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला. त्या वेळी त्या तेहरानच्या तुरुंगात बंद असल्याने, हा पुरस्कार त्यांच्या मुलांनी स्वीकारला होता. आतापर्यंत त्यांना १३ वेळा अटक करण्यात आली असून, ५ वेळा दोषी ठरवण्यात आले आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode
