जकार्ता, 27 नोव्हेंबर (हिं.स.)। इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर आज, गुरुवारी जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.4 नोंदवली गेली असून तो धोकादायक पातळीचा भूकंप मानला जातो. भूकंपाचे धक्के आचे प्रांताच्या आसपास जाणवले. इंडोनेशियाच्या हवामान, वातावरण आणि भूभौतिकी संस्था (बीएमकेजी) यांच्या माहितीनुसार भूकंपाची खोली सुमारे 10 किलोमीटर होती. भूकंपाचे धक्के आसपासच्या अनेक भागांत जाणवले, परंतु यामध्ये अधिकाऱ्यांनी सुनामीचा कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे.
भूकंपाचे धक्के केवळ प्रभावित भागातच नव्हे तर शेजारील प्रदेशांमध्येही जाणवले. धक्के इतके तीव्र होते की घरे आणि इमारती हलू लागल्या. घाबरलेल्या लोकांनी घरांच्या बाहेर धाव घेतली आणि मोकळ्या जागांमध्ये आश्रय घेतला.या भूकंपामुळे आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
इंडोनेशिया सध्या नैसर्गिक आपत्तींच्या तडाख्यातून गंभीरपणे जात आहे. भूकंपाच्या अवघ्या एका दिवस आधी उत्तरी सुमात्रा प्रांतात मुसळधार पावसामुळे आलेल्या अचानक पूर आणि भू-स्खलनात 24 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. सततच्या पावसामुळे नद्यांचे तटबंध तुटले आणि पर्वतीय भागांत चिखल साचल्याने बचाव पथकांना 11 प्रभावित शहरांपर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे.
इंडोनेशिया पॅसिफिक महासागरातील ‘रिंग ऑफ फायर’ क्षेत्रात स्थित असून हे जगातील सर्वात सक्रिय भूकंप आणि ज्वालामुखी उद्रेक क्षेत्रांपैकी एक मानले जाते. यामुळे येथे नैसर्गिक आपत्तींचा धोका कायम असतो.यापूर्वी 5 नोव्हेंबर 2025 रोजी इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटावर 6.2 तीव्रतेचा भूकंप झाला होता. मात्र त्या घटनेत कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची माहिती समोर आली नव्हती. अलिकडच्या काळातील हा दुसरा मोठा भूकंप असून यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण वाढले आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode
