वॉशिंग्टन, 24 ऑगस्ट (हिं.स.)।अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी केल्याच्या कारणाने भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाची अमेरिकेतही टीका होत आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हेली यांनी म्हटले की, भारताने रशियाकडून तेल खरेदीच्या मुद्द्यावर अमेरिकेच्या राष्ट्रपतींशी थेट चर्चा करावी. इतकंच नव्हे तर, त्यांनी भारताला सल्लाही दिला. मात्र, त्याचबरोबर त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाही इशारा दिला आहे.
अमेरिकेच्या माजी राजदूतांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, “राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेला भारताने गांभीर्याने घ्यायला हवे आणि व्हाइट हाऊससोबत चर्चा करून तोडगा शोधायला हवा.” त्यांनी असेही नमूद केले की, “जगातील दोन सर्वात मोठ्या लोकशाही शक्तींमधील दशके जुनी मैत्री आणि परस्पर विश्वास हे सध्याच्या मतभेदांपलीकडे जाण्याची भक्कम पायाभूत रचना आहे.”
याआधीही निक्की हेली यांनी याबाबत इशारा दिला होता. त्या वेळी त्यांनी असा दावा केला होता की, “भारत आणि अमेरिकेचे संबंध एका नाजूक टप्प्यावर उभे आहेत.” एका लेखात त्यांनी लिहिले होते की, “रशियाकडून तेल खरेदी आणि टॅरिफविषयक वाद या गोष्टी दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये कायमस्वरूपी दरी निर्माण करू नयेत.”
निक्की हेली यांनी याआधीही चेतावणी देताना म्हटले होते की, “चीनच्या आर्थिक विस्तारानंतर भारताचा उदय हा सर्वात मोठा भू-राजकीय विकास आहे, आणि जसा भारत अधिक मजबूत होईल, तसतशा चीनच्या महत्वाकांक्षा कमकुवत होतील.” त्यांनी असा दावा केला होता की, “राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये थेट चर्चा झाली पाहिजे.”त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, “जर वेळेत योग्य पावले उचलली नाहीत, तर चीन या संधीचा फायदा घेऊ शकतो.”
—————
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode
