पॅरिस, २३ डिसेंबर (हिं.स.) : दुबईहून तब्बल ३०३ भारतीय नागरिकांना घेऊन निकाराग्वाला जाणारे एक विमान फ्रान्सच्या सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेत त्यांना खाली उतरवले आहे. या विमानातून मानवी तस्करी होत असल्याचा संशय फ्रेंच सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार त्यांनी ही कारवाई केली. दरम्यान दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निनावी सूचनेवरून हे विमान ताब्यात घेण्यात आल्याचे फ्रेंच अधिकाऱ्यांनी सांगितले. रोमानियन चार्टर कंपनीच्या या विमानाने गुरुवारी सकाळी संयुक्त अरब अमिरातीहून उड्डाण घेतले होते. विमान ताब्यात घेण्यात आल्यानंतर प्रवाशांची न्यायालयीन चौकशी सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मानवी तस्करीच्या संशयावरून तपास सुरू असून चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, भारतीय दूतावासाला याबाबत कळवण्यात आले आहे. व्हॅट्री विमानतळावरील रिसेप्शन हॉल प्रवाशांना शक्य तितक्या चांगल्या रिसेप्शन परिस्थितीसह उतरवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
निकाराग्वा आणि मानवी तस्करी यांचा काय संबंध?
निकाराग्वा हा मध्य अमेरिकन देश आहे. निकाराग्वाच्या उत्तरेस होंडुरास, पूर्वेस कॅरिबियन, दक्षिणेस कोस्टा रिका आणि पश्चिमेस पॅसिफिक महासागर आहे. बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करणाऱ्यांसाठी हा देश नंदनवन समजला जातो. दरवर्षी हजारो अवैध स्थलांतरित या देशातून अमेरिका-मेक्सिको सीमेवर पोहोचतात. बेकायदेशीर स्थलांतरितांनाही या मार्गावर अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. यात भौगोलिक स्थान आणि चोरी, दरोड्यासारख्या घटनांचा समावेश होतो. निकाराग्वामध्ये या स्थलांतरितांवर विशेष तपास केला जात नाही.
हिंदुस्थान समाचार
