इस्लामाबाद, 01 फेब्रुवारी (हिं.स.)।पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तान प्रांतात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. लष्कराने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, विविध चकमकींमध्ये किमान ९२ दहशतवादी ठार करण्यात आले आहेत. या संघर्षात पाकिस्तानच्या १५ सैनिकांना आपला जीव गमवावा लागला.
शनिवारी जातीय बलुच गटांशी संबंधित दहशतवाद्यांनी अनेक ठिकाणी हल्ले केले होते. त्यानंतर त्यांना प्रत्युत्तर म्हणून लष्कराने ही कारवाई सुरू केली. दहशतवाद्यांनी क्वेटा, ग्वादर, पंजगुर आणि पसनी या भागांमध्ये शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केला होता. सुरक्षा दल आणि पोलिसांनी उच्च सतर्कतेवर राहून तात्काळ मोर्चा सांभाळला आणि दहशतवाद्यांचा कट उधळून लावला.संपूर्ण बलुचिस्तानमध्ये अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली. या कारवाईदरम्यान तीन आत्मघाती हल्लेखोरांसह ९२ दहशतवादी ठार करण्यात आले. दहशतवाद्यांनी सामान्य नागरिकांनाही लक्ष्य केले. त्यांच्या हल्ल्यांमध्ये महिला, मुले आणि मजुरांसह १८ नागरिकांचा मृत्यू झाला.
लष्कराने सांगितले की, पंजगुर आणि हरनाई जिल्ह्यांमध्ये टीटीपी (तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान) संघटनेचे ४१ दहशतवादी ठार करण्यात आले आहेत. गेल्या दोन दिवसांत एकूण १३३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. बाधित भागांमध्ये अद्यापही लष्करी कारवाई सुरू आहे.लष्कराने स्पष्ट केले की, या भ्याड हल्ल्यांमध्ये सहभागी असलेले लोक आणि त्यांना मदत करणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली जाईल. नॅशनल अॅक्शन प्लॅन अंतर्गत दहशतवादाचा समूळ नायनाट करण्यासाठी ही मोहीम पूर्ण वेगाने सुरूच राहील.बंदी घालण्यात आलेल्या फुटीरतावादी संघटना बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारत, हा ‘हेरोफ’ ऑपरेशन असल्याचा दावा केला. बीएलएने सुरक्षा दलांना मोठे नुकसान झाल्याचा दावा केला असला, तरी पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी हे दावे फेटाळून लावत, हे हल्ले ‘भारत प्रायोजित’ असल्याचे म्हटले आहे.पाकिस्तानी लष्कराने शनिवारी आरोप केला की, हे हल्ले ‘भारत समर्थित उग्रवाद्यांनी’ केले आहेत. मात्र भारताने रविवारी हे आरोप पूर्णपणे फेटाळले आहेत.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले,“पाकिस्तानचे निराधार आरोप आम्ही ठामपणे फेटाळतो.” ते पुढे म्हणाले की, शेजारी देशावर दोषारोप करण्याऐवजी पाकिस्तानने बलुचिस्तानमधील आपल्या जनतेच्या दीर्घकालीन मागण्यांकडे लक्ष द्यावे.बलुचिस्तान हा पाकिस्तानमधील सर्वात मोठा पण सर्वात गरीब प्रांत आहे. तो इराण आणि अफगाणिस्तानच्या सीमेला लागून आहे. येथे गेल्या अनेक दशकांपासून जातीय बलुच फुटीरतावादी चळवळ सुरू आहे. हे गट अधिक स्वायत्तता आणि नैसर्गिक संसाधनांमध्ये मोठा वाटा मिळावा, अशी मागणी करत आहेत. प्रांतात गॅस, खनिजे आणि इतर नैसर्गिक संसाधनांचा प्रचंड साठा असतानाही स्थानिक लोक विकासापासून वंचित राहिले आहेत.
—————
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode
