किव, 9 ऑगस्ट (हिं.स.)
युक्रेनचे
अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी इशारा दिला की, युक्रेन आपली जमीन सोडणार
नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियासोबतच्या शांतता करारात काही
प्रदेशांची देवाणघेवाण समाविष्ट असू शकते या दाव्यानंतर त्यांचे हे विधान आले.
ट्रम्प पुढील शुक्रवारी अलास्कामध्ये त्यांचे रशियन समकक्ष व्लादिमीर पुतिन यांची
भेट घेणार आहेत. या बैठकीत युक्रेन युद्धावर चर्चा होणार आहे.
ट्रम्प-पुतिन
भेटीबाबत झेलेन्स्की म्हणाले की, संविधानात समाविष्ट असलेल्या युक्रेनच्या प्रादेशिक अखंडतेवर कोणतीही
तडजोड करता येणार नाही. कायमस्वरूपी शांततेसाठी होणाऱ्या चर्चेत युक्रेनचा आवाजही
समाविष्ट केला पाहिजे. युक्रेन रशियाला त्याच्या कृतींसाठी कोणतेही बक्षीस देणार
नाही. युक्रेनचे नागरिक रशियाला त्यांच्या भूमीवर कब्जा करू देणार नाहीत.
झेलेन्स्की म्हणाले की, युक्रेनशिवाय कोणताही उपाय शांततेच्या विरोधात आहे. यातून काहीही
साध्य होणार नाही. हे निर्जीव उपाय आहेत आणि ते कधीही काम करणार नाहीत.
झेलेन्स्की
म्हणाले की, त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांच्याशी बोलणे झाले आहे.
त्यांनी सांगितले की, दोन्ही नेत्यांनी युक्रेनला खरोखरच कायमस्वरूपी शांततेची
आवश्यकता आहे यावर सहमती दर्शविली. त्यांनी असेही म्हटले की, रशिया सर्वकाही अशा
मागण्यांकडे नेऊ इच्छितो ज्या पूर्ण होऊ शकत नाहीत. युक्रेनियन राष्ट्राध्यक्षांनी
असेही म्हटले की, ते युद्ध संपवण्यासाठी काम करत असलेल्या ब्रिटन, अमेरिका आणि सर्व भागीदार देशांच्या
वचनबद्धतेचे कौतुक करतात.
—————
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे
