बीजिंग, 23 ऑगस्ट, (हिं.स.) चीनमध्ये एक पूल कोसळल्याने झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमधील एका मोठ्या नदीवर हा पूल बांधला जात आहे. या बांधकाम सुरू असलेल्या रेल्वे पुलाचा मोठा भाग कोसळला. आतापर्यंत या अपघातात १२ कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्याचवेळी इतर चार कामगार बेपत्ता आहेत. अपघाताच्या वेळी पुलावर फक्त १६ लोक उपस्थित होते. आतापर्यंत १२ जणांचे मृतदेह सापडले आहेत. उर्वरित चार जण वाचण्याची शक्यता खूपच कमी असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी रोबोटचा वापरही केला जात आहे.
अपघातानंतर पोलिसांनी फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये पुलाच्या मध्यभागी एक मोठा भाग गायब आहे. पुलाच्या डेकचा एक वाकलेला भाग खाली नदीत लटकत आहे. यावरून पुलाचा मधला भाग कोसळल्याचे दिसून येते. चित्रांमध्ये दोन्ही बाजू हवेत लटकलेल्या दिसत आहेत.
चीनमध्ये अपघाताचा बळी ठरलेला पूल १.६ किलोमीटर (१ मैल) लांब आहे. त्याचा डेक खाली नदीच्या पृष्ठभागापासून ५५ मीटर (१८० फूट) वर आहे. मोठे पूल बांधण्यासाठी चीन जगभर प्रसिद्ध आहे. चिनी अभियंत्यांनी असे अनेक पूल बांधले आहेत, ज्यांची जगभरात एक वेगळी ओळख आहे. जगातील सर्वात उंच आणि सर्वात लांब पूल बांधण्याचा विक्रमही चीनच्या नावावर आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे
