कोल्हापूर, 02 फेब्रुवारी (हिं.स.)।
आधुनिक विचार आणि तरुणाईच्या भावविश्वाशी थेट जोडणारी एक नवी लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे ‘रुबाब’. झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित या बहुप्रतीक्षित चित्रपट ६ फेब्रुवारीपासून सर्वत्र प्रदर्शित होणार असल्याचे दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे यांनी कोल्हापूरात अभिनेता संभाजी ससाणे आणि अभिनेत्री शितल पाटील यांच्या सोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
ते म्हणाले या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या उपस्थितीत भव्यदिव्य सोहळ्यात प्रदर्शीत करण्यात आला.
‘तुझ्यासारखी नको… तूच पाहिजे’ ही हटके टॅगलाईन घेऊन आलेला ‘रुबाब’ केवळ प्रेमकथा नसून, स्वतःची ओळख जपणाऱ्या, आत्मसन्मानाने जगणाऱ्या आणि प्रेमासाठी ठाम उभ्या राहणाऱ्या आजच्या पिढीची गोष्ट आहे. यामध्ये संभाजी ससाणे आणि शितल पाटील यांची फ्रेश जोडी, दमदार संवाद आहेत.
पहिलं प्रेमगीत ‘कसं तरी होतंया रं’ साठी जावेद अली आणि सोनाली सोनवणे यांच्या आवाजाला चिनार-महेश यांच्या सुरेल संगीताची साथ लाभली आहे. तर ‘पॉम पॉम’ हे गाणं जल्लोष, पार्टी आणि उत्सवाचा नवा ठेका ठरणार आहे. नकाश अजीज आणि सोनाली सोनवणे यांच्या जोशपूर्ण गायकीतून हे गाणे प्रत्येक सेलिब्रेशनमध्ये रंग भरणार आहे. रोमँटिक गाणं ‘मन जुळले’ प्रेमातील भावनिक जवळीक, विश्वास आणि नितळ नात्याचा स्पर्श अनुभवायला लावते. केतकी माटेगावकरच्या सुमधुर आवाजात हे गाणं आहे.
दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे म्हणतात, “‘रुबाब’ हा आजच्या पिढीच्या प्रेमाचा ठाम आवाज आहे. प्रेमासाठी उभं राहणं, स्वतःच्या तत्त्वांवर जगणं आणि भावना निर्भीडपणे व्यक्त करणं हाच या चित्रपटाचा आत्मा आहे.”
झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केले असून संजय झणकर आणि गौरी झणकर हे चित्रपटाचे निर्माते आहेत. उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. या चित्रपटात संभाजी ससाणे आणि शितल पाटील प्रमुख भूमिकेत झळकणार असून, ही नवी जोडी प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकतेचा विषय ठरणार आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar
