सिंधुदुर्ग, 2 डिसेंबर (हिं.स.) : कोकणची रंगभूमी नाट्यकर्मी नाट्यप्रेमी, कलाप्रेमीनी बहरलेली आहे. ही कोकणची रंगभूमी आता संपूर्ण राज्यात व राज्याच्या बाहेर पोचली पाहिजे, असे प्रतिपादन राज्य शासनाच्या सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष जेष्ठ सिने नाट्य अभिनेते विजय गोखले यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच सेन्सॉर बोर्डची सभा शुक्रवारी डिसेंबरला कणकवली येथील पंचायत समितीच्या भालचंद्र महाराज सभागृहात मंडळाचे अध्यक्ष सिनेस्टार विजय गोखले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
यावेळी बोलताना गोखले म्हणाले सिंधुदूर्ग जिल्हा नाट्यचळवळीची खाण आहे. कोंकणात आम्ही मोठ्या प्रमाणात नाटके केलीत. या सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या सांस्कृतिक चळवळीला वेगळी दिशा देण्याची गरज आहे. यासाठी येथील नाट्यकर्मी सिने नाट्य अभिनेते विजय चव्हाण व त्यांची टीम निश्चितच भरीव कामगिरी करणार यात शंका नाही. जिथे विजय नावाची व्यक्ती आहे तिथे सांस्कृतिक चळवळीला उर्जा प्राप्त होणार आहे ते आपल्या गटविकास अधिकारी या पदावरून निवृत्त झाल्यानंतर जिल्ह्यातील सांस्कृतिक चळवळीकडे वळले आहेत हे कौतुकास्पद आहे. सेन्सॉर बोर्ड हे रंगभूमीशी निगडित अंग असले तरी येथील सांस्कृतिकमधील जे काही मूलभूत प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील असे सांगितले.
विजय चव्हाण म्हणाले, रंगभूमी आणि सांस्कृतिक कामात योगदान दिलेल्या दिगगजांची निवड या समितीवर केली जाते. आजवर रंगभूमी सेन्सॉर बोर्डच्या सभा या पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक सारख्या मोठ्या शहरांत होत असतात. संपूर्ण महाराष्ट्रात सेन्सॉर बोर्डचे ४५ सदस्य असून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच रंगभूमी महाराष्ट्र राज्याच्या रंगभूमी सेन्सॉर बोर्डची सभा जिल्ह्यात झाली ही बाब सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी भूषणावह आहे. सिंधुदुर्ग जिल्हा ही कलाकारांची भूमी आहे. दशावतार ही कोकणची लोककला असून घराघरांत कलाकार आहेत. सिंधुदुर्गातील सर्व रंगकर्मीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात रंगभूमी सेन्सॉर बोर्डची होणारी सभा सुवर्णसंधी ठरली .
यावेळी पद्मश्री परशुराम गंगावणे पिंगुळी, जेष्ठ दशावतार यशवंत तेंडोलकर तेंडोली, जेष्ठ रंगकर्मी सुहास वरुणकर कणकवली, जेष्ठ ठाकर लोककलाकार सुरेश रणसिंग पिंगुळी, कथक विशारद पदवी प्राप्त नृत्यांगना मृणाल सावंत पिंगुळी, या सर्वांना शाल श्रीफळ मानपत्र देऊन सेन्सॉर बोर्ड अध्यक्ष जेष्ठ सिने नाट्य अभिनेते गोखले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे नेटनेटके आयोजन अक्षरसिंधू साहित्य कला मंच सिंधुदूर्ग कणकवलीच्या टीमने केले होते. या सर्वांना श्री गोखले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
हिंदुस्थान समाचार
