नाशिक, ०९ डिसेंबर, (हिं.स.) : काही वर्षा पूर्वी एकत्र येऊन चित्रपट पाहणे पर्वणी होती मात्र आता काळ बदलला, या बदलत्या काळात अंकुर सारखा फिल्म फेस्टिवल पर्वणी आहे. याचा सर्वांनी फायदा घेतला पाहिजे, दुसरीकडे माहितीपटाकडे नेहमी इतिहासाचा साक्षीदार आणि ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून बघितले जाते. मात्र बदलत्या तंत्रज्ञानामुळे प्रत्येक मोबाईलमध्ये कॅमरा आला आहे. प्रत्येक जण काही तरी चित्रित करून आपण माहितीपट बनविला असल्याचा दावा करतांना दिसतो. त्यामुळेच आता माहितीपट बनविणे अतिशय सोपे झाले असले वाटत असले तरी सध्याचा काळ माहितीपटासाठी आव्हानात्मक असल्याचे मत प्रसिद्ध माहितीपट निर्माते राहुल रॉय, नवी दिल्ली यांनी व्यक्त केले आहे.
कुसुमाग्रज स्मारकात अभिव्यक्ती मिडीया फॉर डेव्हलपमेंट आयोजित १० व्या अंकुर फिल्म फेस्टिव्हलच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राहुल रॉय यांची द फॅक्टरी हा माहितीपटाचे सादरीकरण करून त्यावर चर्चा करण्यात आली.समाजातील नवोदित कलाकारांना, वंचित समूहांतील घटकांना आपले जगणे मांडण्यासाठी संधी मिळावी या उद्देशाने दरवर्षी अंकुर फेस्टीवलचे आयोजन करण्यात येते. यंदाही हीच परंपरा कायम राखत फेस्टिव्हल संपन्न होत आहे.
फेस्टीव्हलच्या उद्घाटनप्रसंगी माहितीपट निर्मितीवर विचारमंथन पार पडले. आता पुढे दोन दिवस दिवसभर वेगवेगळ्या फिल्म्स, माहितीपट यांचे सादरीकरण केले जाणार आहे. यावेळी अभिव्यक्तीचे भिला ठाकरे यांनी संस्थेची माहिती दिली. अविनाश नेवे यांनी अंकुर आयोजना मागचे प्रयोजन विशद केले. तर चित्रपट समीक्षक रघुनाथ फडणीस यांनी फेस्टीव्हलमध्ये सहभागी झालेल्या फिल्मविषयी चर्चा केली. तर नितिन परांजपे यांनी राहुल रॉय यांचा सत्कार केला.
हिंदुस्थान समाचार
